पुणे: खेड तालुक्यात भिवेगाव च्या हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. लक्षमण रामभाऊ वनघरे (वय ५३ ) असे शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरूवार (दि. १९) संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली.
तालुक्यातील भिमाशंकर परीसर अभयारण्याचा भाग असुन भिवेगाव, भोरगीरी परिसरातील घनदाट जंगलातून शेतकरी नेहमी शेतीच्या कामासाठी ये जा करत असतात. परंतु अनेक वर्षात बिबटया किंवा वन्यजीवांचा कधीही ञास झाला नाही. परंतु काही दिवसात बिबट्याचा वावर अचानक वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती. सहाच्या सुमारास जनावरांना चरण्यासाठी वनघरे गेले होते. विसावा या भिवेगावपासून काही अंतरावर जनावरांच्या मागे असलेल्या लक्ष्मण वनघरे यांना बिबट्याने झडप मारून पकडले. काही अंतर पुढे गेल्यावर शेतकऱ्याचा आवाज आल्यावर जवळ असलेल्या दोघांनी आरडाओरडा केला. बिबट्या अंगावर धावून जात होता. थोड्या वेळाने बिबटया पळून गेल्यावर गावकरी मृतदेहाजवळ जाऊ शकले. ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली असुन उशीरा पर्यंत चेतन नलावडे व वनविभागांची कर्मचारी पंचनामा करत होते.