पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको, वनविभागाची गाडी व बेस कॅम्प जाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 21:52 IST2025-11-02T21:51:05+5:302025-11-02T21:52:59+5:30
रविवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास रोहन घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत होता. हत्ती गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले.

पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको, वनविभागाची गाडी व बेस कॅम्प जाळले
मलठण: पिंपरखेड ( ता शिरूर) येथे ऊसाच्या शेतात खेळत असलेल्या १३ वर्षीय रोहन विलास बोंबे या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला फरपटत नेले. या हृदयद्रावक घटनेत रोहनचा दुर्दैवी मृत्यू झाला. वीस दिवसांत घडलेली ही तिसरी घटना असून, संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी फोडून पेटवून दिली, तसेच बेस कॅम्पचे ऑफिस जाळले. ठोस उपाययोजना होईपर्यंत शवविच्छेदन व अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. पंचतळे व रोडेवाडी फाटा येथे दीड ते दोन हजार ग्रामस्थांनी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला.
रविवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास रोहन घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत होता. हत्ती गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले. बराच वेळ मुलगा दिसत नसल्याने आई-वडिलांनी शेजाऱ्यांना बोलावून शोध सुरू केला. तरुणांनी आरडाओरड करत ऊसशेतात शोध घेतला असता रोहनचा मृतदेह आढळला.
या घटनेने परिसर हादरला. वीस दिवसांत तिसरी घटना घडल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला. यापूर्वी दि. १२ शिवण्या बोंबे व दि. २२ भागुबाई जाधव यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. वनविभागाकडून ठोस बंदोबस्त न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी वनविभागाची गाडी फोडून-पलटी करून पेटवून दिली, तसेच बेस कॅम्पचे ऑफिस जाळले.
"दोन वेळा रास्तारोको केला, तरी वनविभाग व प्रशासनाला जाग येत नाही. अजून किती बळी गेल्यानंतर उपाययोजना होतील? निवडणुकांत मतदान बहिष्कार टाकू," अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. रोहनचे पालक व ग्रामस्थांनी ठोस निर्णय व वनमंत्र्यांच्या उपाययोजनांशिवाय शवविच्छेदन व अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली.
पंचतळे (बेल्हा-जेजुरी महामार्ग) व रोडेवाडी फाटा (अष्टविनायक महामार्ग) येथे दीड ते दोन हजार ग्रामस्थांनी रास्तारोको करून वाहतूक ठप्प केली. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.