जिल्ह्यात आरटीईचे ८६ टक्के प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:29 IST2020-12-04T04:29:33+5:302020-12-04T04:29:33+5:30
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून पुणे जिल्ह्यात आरटीईचे ...

जिल्ह्यात आरटीईचे ८६ टक्के प्रवेश
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून पुणे जिल्ह्यात आरटीईचे सुमारे ८६ टक्के प्रवेश झाले आहेत. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या १६ हजार ९५० जागांपैकी आत्तापर्यंत १४ हजार ४१५ जागांवर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरु केली जाते. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये आरटीई प्रवेशाच्या जागा रिक्त राहतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू ठेवली. पुणे जिल्ह्यात ९७२ शाळांमधील १६ हजार ९५० जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले तब्बल ६२ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी या जागांसाठी अर्ज केले. त्यातील १६ हजार ६१७ विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीने प्रवेशासाठी निवड केली. आरटीई प्रवेशाच्या नियमित फिरीमधून ११ हजार १४१ तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जात असलेल्या फेरीतून ३ हजार २७४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे.
राज्यात आरटीई प्रवेशाच्या सर्वाधिक जागा पुणे जिल्ह्यात आहेत. यंदा आरटीईच्या सुमारे दोन हजार जागा शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे अनेक पालक व विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.