- संतोष गाजरे
पुणे : अमेरिका-इस्राईल यांचे संयुक्तपणे शनिवारपासून (दि. २८) इराणवर जोरदार हल्ले सुरू आहेत. इराणने ड्रोनद्वारे दुबईतील बुर्झ खलिफावर हल्ला केला; तसेच अबुधाबी येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले केल्याने पश्चिम आशियातील संपूर्ण हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुण्यातील ८४ विद्यार्थी आणि चार प्राध्यापक दुबईमध्ये अडकले आहेत. तसेच अनेक भारतीय मायभूमीत परतण्यासाठी अबुधाबी व दुबई येथील विमानतळांवर गर्दी केल्याची सांगण्यात आले आहे.इंदिरा विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिझनेसमधील ८४ एमबीए विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा (स्टडी टूर) दुबई येथे आयोजित करण्यात आला होता. यासाठी ४० विद्यार्थ्यांच्या दोन तुकड्या (बॅच) व चार शिक्षक असे ८४ जण दुबई येथे दि. २२ व दि. २३ फेब्रुवारीला गेले होते. शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) व रविवारी (दि. १) दोन्ही तुकड्या दुबईवरून पुण्यामध्ये परतणार होत्या. मात्र, अमेरिका-इस्राईल यांच्या संयुक्तपणे इराणवरील हल्ल्यामुळे दुबईतून भारतात होणारी विमान वाहतूक सेवा बंद करण्यात आल्यामुळे सध्या ८४ जण तेथे अडकले आहेत.
विद्यार्थी आणि प्राध्यापक सुरक्षित असून विद्यापीठ परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. हवाई क्षेत्र खुले झाल्यावर त्यांना सुरक्षित भारतात आणण्याची व्यवस्था लवकरात लवकर केली जाईल, असे इंदिरा विद्यापीठाच्या कुलसचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
दुबई येथे आमचा मुलगा स्टडी टूरसाठी गेला असता काही ठिकाणी अचानक हल्ले झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे विमानसेवाही बंद आहे. आमची मुले सुरक्षित असून त्यांच्याशी संपर्क होत आहे; परंतु भारत सरकारकडून दुबई येथे गेलेल्या सर्वांना परत आणण्यासाठी मदत मिळावी. - पालक
आम्ही स्टडी टूरसाठी दुबईला आलो होतो. आमची फ्लाइट रद्द झाल्याचे आम्हाला कळले. आम्ही सध्या एका हॉटेलमध्ये सुरक्षित असून आमची जेवणाची, नाष्ट्याची सोय आहे; तसेच महाविद्यालय व भारतीय राजदूत आम्हाला सुखरूप भारतात आणतील, अशी खात्री आहे.- भूषण वाघ, विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामधील विद्यार्थी सध्या दुबई येथे सुरक्षित असून त्यांच्याशी व त्यांच्या पालकांशी आमचा संपर्क सुरू आहे. विमानसेवा सुरू झाली की लगेचच ते परतणार आहेत. आमचा भारत सरकार व नागरी हवाई उड्डाण खात्याशीही संपर्क सुरू आहे. - तरिता शंकर, अध्यक्ष, इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट