एका एकरात ७० टन उसाचे उत्पादन

By Admin | Updated: February 13, 2017 01:20 IST2017-02-13T01:20:19+5:302017-02-13T01:20:19+5:30

कोंढापुरी येथील प्रयोगशील शेतकरी संभाजी ज्ञानोबा गायकवाड यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रात एक डोळा पद्धतीने २६५ उसाच्या जातीची दोन ओळीत

70 tons of sugarcane production in one acre | एका एकरात ७० टन उसाचे उत्पादन

एका एकरात ७० टन उसाचे उत्पादन

संजय देशमुख / रांजणगाव गणपती
कोंढापुरी येथील प्रयोगशील शेतकरी संभाजी ज्ञानोबा गायकवाड यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रात एक डोळा पद्धतीने २६५ उसाच्या जातीची दोन ओळीत ५ फूट अंतरावर लागवड केली. अवघ्या १० महिन्यांत ७० टनाचे उत्पादन घेऊन उसाचे थळ न पेटविता ट्रॅक्टर रोटाव्हेटरच्या सहाय्याने पाचटाचे बारीक तुकडे करुन ते तसेच दोन ओळीत ठेवून पाचटाचा आच्छादन म्हणून वापर केला आहे. त्यामळे ऊस तुटून जाऊन दीड महिना झाला तरी अद्याप त्या खोडवा उसाला पाणी देण्याची आवश्यकता भासली नाही. शिवाय रोटोव्हेटरमुळे ऊसतोडणी मजुराकंडून जमिनीच्यावर राहिलेली उसाची धसकटे जमिनीलगत तुटली जाऊन उसाला जमिनीतून जास्त प्रमाणात कोंब फुटून उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्या पाचटावर अल्पसा युरिया मारल्याने पाचट लवकर कुजण्यास मदत होते, हे कुजलेले पाचट पिकाला सेंद्रिय खत म्हणून फायदेशीर होते आणि उत्पन्नात मोठी भर पडत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
आजच्या आधुनिक युगात शेती व्यवसायातही आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. अनेक शेतकरी पांरपरिक शेतीपद्धती ऐवजी विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीमध्ये करु लागल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
भाजीपाला, फळबागा, फुलझाडे तसेच कांदा, उसासारखे नगदी पिकांचे उत्पादन घेताना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळविता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यातलेच नवीन तंत्रज्ञान मल्चिंग पेपरचा वापर म्हणजेच आच्छादनाचाही मोठ्या प्रमाणात शेतकरी विविध प्रकारची पिके घेताना वापर करू लागले आहेत. आज टोमॅटो, मिरची, काकडीसारखा भाजीपाला, कलिगंड, खरबूज, स्ट्रॉबेरीसारखी फळासाठी मल्चिंग पेपर आणि उसासारख्या नगदी पिकात ऊस तुटून गेल्यानंतर पाचट न जाळता त्याच पाचटाचा उसाच्या खोडवा पिकात आच्छादन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. उसाचे पाचट, वाळलेले गवत, भाताचे तूस, लाकडाचा भुसा, झाडांची वाळलेली पाने आणि पॉलिथिनचा मल्चिंग पेपर पिकांना आच्छादन म्हणून वापरला जातो. आच्छादनापैकी मल्चिंग पेपर सोडल्यास इतरांचा कालांतराने कुजून सेंद्रिय खतात रूपांतर होते आणि त्याचा फायदा पिकाला होतो. परिणामी खताचीही बचत होते. एकंदरीतच आच्छादनाच्या वापरामुळे, पाणी, खते व आंतरमशागतीच्या खर्चात मोठी बचत होऊन दर्जेदार व भरपूर उत्पादन मिळत आहे. पिकात आच्छादनाचा वापर करावा, असे आवाहन संभाजी गायकवाड व पी. बी. वामन यांनी केले आहे.

Web Title: 70 tons of sugarcane production in one acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.