उजनी धरणसाठ्यात ७ टीएमसीने वाढ
By Admin | Updated: August 2, 2014 04:24 IST2014-08-02T04:24:17+5:302014-08-02T04:24:17+5:30
खडकवासला आणि भीमा नदीच्या खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

उजनी धरणसाठ्यात ७ टीएमसीने वाढ
बारामती/कालठण : खडकवासला आणि भीमा नदीच्या खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. खडकवासला धरणामधून ७० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या उजनी धरणामध्ये सुरू आहे. त्यामुळे उजनी धरण वजा पातळीमधून बाहेर आले आहे. सध्या प्रतिदिवशी उजनी धरणामध्ये ७ टीएमसी पाण्याचा विसर्ग खडकवासला आणि पाणलोट क्षेत्रामधून होत आहे.
पावसाळा सुरू झाला, तरी अद्याप इंदापूर आणि उजनी धरणक्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यातच गेल्या वर्षी उजनी धरणात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक साठा असतानाही योग्य नियोजनाअभावी धरणातील पाणीसाठा वजा पातळीपर्यंत गेला होता. परिणामी, पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली होती. धरण क्षेत्राच्या वरील भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. मुळा-मुठा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हे सर्व पाणी उजनी धरणामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वजा पातळीमधून उजनी धरण बाहेर आले आहे. धरणामध्ये दररोज १२ टक्के म्हणजे जवळपास ७ टीएमसी पाणीसाठा जमा होत आहे. जर पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर असाच राहिला, तर आॅगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी माहिती पाटबंधारे खात्याच्या सूत्रांनी दिली.