विद्यमान सभापतींसह ७ अर्जांवर हरकती!
By Admin | Updated: August 14, 2015 03:18 IST2015-08-14T03:18:31+5:302015-08-14T03:18:31+5:30
सकाळी ११ वाजता अधिकृत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली.

विद्यमान सभापतींसह ७ अर्जांवर हरकती!
नारायणगाव : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज (दि. १३) झालेल्या छाननीत १८१ अर्जापैकी १७४ अर्ज वैध ठरले असून ७ अर्जांवरील निर्णय राखून ठेवण्यात आला असून,
उद्या (दि. १४) सकाळी ११ वाजता अधिकृत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली. दरम्यान, विद्यमान सभापती संजय काळे, विद्यमान संचालक गजानन उर्फ नाना घोडे, तुळशीराम शिंदे, सीताराम खिलारी, भगवान घोलप या ५ जणांच्या उमेदवारी अर्जावर उत्पन्न जास्त असणे, लाभार्थी असणे, मुख्य उत्पन्न शेतीपासून नाही आदि कारणांवरून प्रतिस्पर्धी राजकीय विरोधकांनी छाननीच्यावेळी आक्षेप घेतला आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार दिलीप मोहिते हे बाजार समितीचे संचालक असताना त्यांच्या कंपनीला कंत्राट मिळाल्याने ते लाभार्थी ठरतात म्हणून त्यांचा अर्ज बाद ठरवावा, अशी हरकत घेण्यात आली होती. आज दिवसभराचा वेळ घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी मोहिते यांचा अर्ज नामंजूर केला. या पार्श्वभूमीवर उद्या निवडणूक अधिकारी काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छाननीतच प्रस्थापित उमेदवाराना बाहेर काढण्यासाठी विरोधकांनी चंग बांधला आहे़ छाननीच्यावेळी तक्रारदार आणि विद्यमान संचालकांनी वकीलांची फौजच उपस्थित केली होती. दोन्हीकडील म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी या ५ विद्यमान संचालकांचा निर्णय राखून ठेवला आहे. विद्यमान संचालकांच्यावर घेण्यात आलेलल्या हरकतीमुळे राजकीय नेत्यांची दिवसभर चांगलीच धावपळ सुरू होती.
दरम्यान विद्यमान सभापती संजय काळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध झाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. त्यामुळे छाननीतच संजय काळे यांना झटका देण्याचा प्रयत्न अयशस्वी होणार आहे .
संवर्गनिहाय वाढ अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे- सोसायटी गटातील सर्वसाधारण संवर्गाच्या ७ जागांसाठी ६३ अर्ज, महिला राखीव गटाच्या १२ अर्ज, इतर मागास प्रवर्ग संवर्गासाठी-१० अर्ज, भटक्या विमुक्त जाती-जमाती संवर्गासाठी ५ अर्ज, ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण संवर्गासाठी ३३ अर्ज, आर्थिक दुर्बल गटाच्या १० अर्ज, अनूसूचित जाती-जमाती गटाच्या १३ अर्ज, व्यापारी व अडते संवर्गाच्या १४ अर्ज,हमाल व मापारी गट ११ अर्ज, पणन ३ अर्ज अशा एकूण १७४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. (वार्ताहर)