स्मार्ट सिटीच्या सूचनांवर ६३ हजार जणांचे मतदान
By Admin | Updated: August 10, 2015 02:44 IST2015-08-10T02:44:39+5:302015-08-10T02:44:39+5:30
स्मार्ट सिटी योजनेकरिता नागरिकांनी केलेल्या सूचनांमधून सर्वोकृष्ट तीन सूचना निवडण्यासाठी आॅनलाइन मतदान घेण्यात आले. नागरिकांच्या सूचनांना १५ लाख हिट्स मिळाल्या

स्मार्ट सिटीच्या सूचनांवर ६३ हजार जणांचे मतदान
पुणे : स्मार्ट सिटी योजनेकरिता नागरिकांनी केलेल्या सूचनांमधून सर्वोकृष्ट तीन सूचना निवडण्यासाठी आॅनलाइन मतदान घेण्यात आले. नागरिकांच्या सूचनांना १५ लाख हिट्स मिळाल्या, तर तब्बल ६३ हजार नागरिकांनी यावर मतदान करून आपले मत नोंदविले. १५ आॅगस्टला विजेत्यांची निवड जाहीर करून त्यांना बक्षिसाचे वितरण केले जाणार आहे.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेकरिता पुणे महापालिकेकडून प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्या प्रस्तावामध्ये कोणत्या योजनांचा समावेश करावा, यासाठी नागरिकांची मते मागविण्यात आली होती. सर्वोकृष्ट सूचना करणाऱ्यांना पालिकेकडून बक्षिसे देण्यात येणार आहेत. नागरिकांनी या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. ५ लाख जणांनी या संकेतस्थळाला भेट देऊन ६ हजार सूचना केल्या होत्या.
या कालावधीत तब्बल १५ लाख १ हजार १७५ नागरिकांनी या आॅनलाइन मतदानावर आपल्या हिट्स दिल्या आहेत. तर ६३ हजार ५६ नागरिकांनी आॅनलाइन मतदान केले आहे. यापैकी सर्वाधिक मत मिळविलेल्या सूचनांचा विचार करून त्यातून ३ विजेत्यांची निवड केली जाणार आहे. सर्वोत्कृष्ट सूचनांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेमध्ये होणार आहे. तसेच त्या सूचनांवर प्रत्यक्ष अवलंब केला जाणार असल्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केले आहे.