महिलेच्या खात्यातून काढले परस्पर ६ लाख; कर्वे रोड परिसरातील प्रकार, बँक, एजंटचा इन्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:24 IST2017-12-12T15:20:03+5:302017-12-12T15:24:43+5:30
महिलेच्या खात्यातून बँकेच्या एजंटने कर्मचाऱ्यांच्या संगनमताने तब्बल ६ लाख रुपये परस्पर काढून घेण्याचा प्रकार कर्वे रोडमध्ये उघडकीस आला आहे.

महिलेच्या खात्यातून काढले परस्पर ६ लाख; कर्वे रोड परिसरातील प्रकार, बँक, एजंटचा इन्कार
पुणे : महिलेच्या खात्यातून बँकेच्या एजंटने कर्मचाऱ्यांच्या संगनमताने तब्बल ६ लाख रुपये परस्पर काढून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ हा प्रकार कराड अर्बन सहकारी बँकेच्या कर्वे रोड शाखेमध्ये ३ एप्रिल २०१२ ते जानेवारी २०१७ च्या दरम्यान घडला आहे़ मात्र, बँक अधिकारी व बँकेचे पिग्मी एजंट यांनी त्याचा इन्कार केला असून पैसे काढताना त्या स्वत: हजर असल्याचा दावा केला आहे़
याप्रकरणी हेमलता भालेराव (वय ५२, रा़ पौड रोड, कोथरूड) यांनी कोथरूड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेराव यांचे पती दत्तात्रय चोरगे यांचे एप्रिल २०१२ मध्ये निधन झाले़ भालेराव यांच्या बँकेच्या रिकरिंग खात्यात पैसे भरण्याचे काम एजंट गणेश शिंदे हा करीत असे़ त्याने बनावट स्वाक्षरी करुन २२ जून २०१२ मध्ये त्यांच्या रिकरिंग खात्यातील ६ लाख ३६ हजार ६०६ रुपये काढून ते बचत खात्यात वर्ग केले़ त्यानंतर ४ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांची खोटी स्वाक्षरी करुन बचत खात्यातील ६ लाख ३६ हजार ५०० रुपये काढून फसवणूक केली असे फिर्यादीत म्हटले आहे़
या फिर्यादीवरुन कोथरूड पोलिसांनी गणेश शिंदे (रा़ एरंडवणा) आणि कराड अर्बन सहकारी बँक कर्वे रोड शाखेतील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे़ मात्र, बँकेचे अधिकारी व पिग्मी एजंट गणेश शिंदे यांनी याचा इन्कार केला असून पैसे काढण्याच्या वेळी त्या स्वत: हजर असल्याचा दावा केला आहे़ अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर जाखडे करीत आहेत़