पुणे : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील सुमारे साडेसहाशे पर्यटकांपैकी साडेपाचशे पर्यटक मंगळवारपर्यंत (दि. २९) पुण्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. राज्य सरकारने विमानाने सोय केलेल्या पर्यटकांव्यतिरिक्त हे पर्यटक असून यातील बहुतांशजण स्वतःच विमान, रेल्वे आणि खासगी गाडीने पुण्यात येणार आहेत, असेही सांगण्यात आले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पुणे जिल्ह्यातील ६५७ पर्यटकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या हेल्पलाइनवर कळविले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या सर्वांची यादी राज्य सरकारकडे पाठविली. राज्य सरकारने यातील तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांतील पर्यटकांना आणण्यासाठी विशेष विमानांची सोय केली होती. जिल्हा प्रशासनाकडे माहिती असलेल्या यादीतील पर्यटकांशी संपर्क साधल्यानंतर या पर्यटकांनी स्वत: विमान, रेल्वे आणि खासगी गाडीने पुण्यात परतत असल्याची माहिती दिली.
त्यानुसार गुरुवारी (दि. २४) २३८ पर्यटक विमानाने पुण्यात परतले, तर गुरुवारी (दि. २५) विमानाने ८३, रेल्वेने २२ असे एकूण १०५ पर्यटक स्वगृही परतले आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २६) ४४ पर्यटक विमानाने, ५१ रेल्वेने असे एकूण ९५ जण परतणार आहेत, तर रविवारी (दि. २७) विमानाने ११, रेल्वेने ३९, तर खासगी गाडीने रस्त्याने ४० असे एकूण ९० जण पुण्यात येणार आहेत. सोमवारी (दि. २८) एकजण विमानाने, तर मंगळवारी (दि. २९) ८ विमानाने, ९ रेल्वेने असे एकूण १७ जण परतणार असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील एकूण ५४६ पर्यटक मंगळवारपर्यंत परतणार आहेत. या सर्व पर्यटकांच्या सातत्याने संपर्कात जिल्हा प्रशासन असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.