५० हजारांची लाच घेताना पकडले
By Admin | Updated: January 28, 2017 00:11 IST2017-01-28T00:11:05+5:302017-01-28T00:11:05+5:30
महसुली दाव्यांच्या कामात पिळवणूक होते, अशी तक्रार बारामती तालुक्यातील नागरिकांची आहे. त्याचअनुषंगाने आज जमिनीच्या

५० हजारांची लाच घेताना पकडले
बारामती : महसुली दाव्यांच्या कामात पिळवणूक होते, अशी तक्रार बारामती तालुक्यातील नागरिकांची आहे. त्याचअनुषंगाने आज जमिनीच्या पोटखराबाची दुरुस्ती निकालाचे काम वरिष्ठांकडून करून घेण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच शिपायामार्फत स्वीकारताना तहसील कार्यालयातील लिपिकाला व प्रांत कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
मागील काही महिन्यांपासून महसुली जमिनींच्या दाव्यांच्या कामात पिळवणूक केली जाते, अशी नागरिकांची तक्रार होती. याबाबत जमिनीच्या पोटखराब दुरुस्तीच्या कामासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. त्यावर सुनावणी झाली होती. सुनावणीचा निकाल प्रलंबित होता. हे काम वरिष्ठांकडून करून घेण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. तहसील कार्यालयातच दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लिपिक जमीर सलीम मुलाणी (वय ४२, रा. फ्लॅट नं. ४, तोरणा सोसायटी, कसबा, फलटण रोड, बारामती) आणि प्रांत कार्यालयातील शिपाई समीर आदम सय्यद (वय ३७, रा. कसबा, बारामती) या दोघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनीता साळुंके, पोलीस निरीक्षक अरुण घोडके आणि त्यांच्या पथकाने भाग घेतला. आरोपींवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे तहसील कार्यालयातील आर्थिक पिळवणुकीबाबतचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. ‘गोपनीयते’च्या नावाखाली निकालाची माहिती दिली जात नाही. त्यासाठी आर्थिक मागणी केली जाते, अशी तक्रार आज या कारवाईनंतर नागरिकांची होती.