पुणे: गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी रात्री उशिरापर्यंत पीएमपी प्रवासी सेवा सुरू होते. या काळात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १ हजार ७० फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून पाच लाख ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडीच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी रात्री दोनपर्यंत बस सुरू होते. त्यामुळे लाखो प्रवाशांना सोयीचे झाले. दरम्यान, या काळात विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांची संख्यादेखील वाढली आहे. पीएमपीकडून विविध मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले होते. त्यामुळे सर्व मार्गांवर रात्री उशिरापर्यंत बसची तपासणी करण्यात येत होती. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पीएमपीमध्ये विनातिकीट प्रवास करताना आढळले, तर प्रवाशांना ५०० रुपये आकारले जातात. त्यामुळे प्रवाशांना दहा रुपये वाचविण्यासाठी ५०० रुपये दंड भरावा लागतो. पिंपरी-चिंचवड शहरापेक्षा पुण्यात जास्त फुकटे सापडले आहेत.
मार्गावर दोन-तीन पथके
गेल्या दोन महिन्यांपूर्वी पीएमपीतील दोनशे कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली. यामध्ये तिकीट तपासनीसांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पीएमपीत तिकीट तपासणी करणाऱ्यांची संख्या ३०० हून अधिक आहे. परिणामी, पीएमपीच्या सर्व मार्गांवर दोन ते तीन पथके थांबलेली असतात. प्रत्येक मार्गावर एका बसची दोन ते तीन वेळा तपासणी करण्यात येते. त्यामुळे फुकटे सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. दहा रुपयांसाठी ५०० रुपये दंड देण्यापेक्षा तिकीट काढून प्रवास करणे सोयीचे झाले आहे.
अशी आहे आकडेवारी :दिनांक --- वसूल दंड
२७ ऑगस्ट -- २०,५००२८ ऑगस्ट -- ४०,५००
२९ ऑगस्ट -- ४३,०००३० ऑगस्ट -- ४८,०००
३१ ऑगस्ट --४७,०००१ सप्टेंबर -- ५५,५००
२ सप्टेंबर -- ६७,०००३ सप्टेंबर -- ५४,५००
४ सप्टेंबर -- ६९,०००५ सप्टेंबर -- ४८,५००
६ सप्टेंबर -- ४१,५००