पोलिओमुक्तीचे इनाम ५ रुपये!
By Admin | Updated: February 10, 2017 03:18 IST2017-02-10T03:18:30+5:302017-02-10T03:18:30+5:30
पल्स पोलिओ मोहिमेच्या कष्टप्रद कामाच्या अवघ्या २० रुपये प्रवासभत्त्यातही १५ रुपयांची कपात करून तो ५ रुपये करण्याचा अजब निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

पोलिओमुक्तीचे इनाम ५ रुपये!
पुणे : पल्स पोलिओ मोहिमेच्या कष्टप्रद कामाच्या अवघ्या २० रुपये प्रवासभत्त्यातही १५ रुपयांची कपात करून तो ५ रुपये करण्याचा अजब निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या कार्यालयासमोरच अंगणवाडीतार्इंनी ठिय्या दिला. अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. येत्या एप्रिलमधील पोलिओ मोहिमेसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव ठेवू, असे या वेळी डॉ. पाटील म्हणाल्या.
अनेक वर्षांच्या पोलिओ निर्मूलनाच्या सातत्यपूर्ण मोहिमेनंतर अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त देश म्हणून जाहीर केले. या यशात लाखो अंगणवाडीताई, आशाताई, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा सिंहाचा वाटा आहे. देशभरात एकाचवेळी एक दिवस बूथवर पोलिओ डोस देण्याची मोहीम वर्षातून दोनदा होते. ती झाल्यावर त्या दिवसानंतर पुढचे ५ दिवस, वरील स्वयंसेवक वाडी-वस्ती, आदिवासी पाडे, झोपडपट्ट्या, बहुमजली इमारती इ. ठिकाणी पायपीट करत बूथवर न आलेल्या ० ते ५ वयोगटातील बालकांचा शोध घेत त्याला घरी जाऊन डोस पाजतात. वर्षानुवर्षे हे काम तळमळीने केल्यानेच देश पोलिओमुक्त झाला. या कामासाठी त्यांना ७५ रुपये मानधन व २० रुपये प्रवासभत्ता मिळत असे. परंतु, नुकत्याच २९ जानेवारीला झालेल्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी या प्रवासभत्त्यात १५ रुपयांची कपात करून तो ५ रुपये करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला होता. त्याविरुद्ध पल्स पोलिओ मोहिमेचे काम करणाऱ्या घटकांमध्ये संतापाची भावना होती. त्याचा परिणाम या आंदोलनात दिसून आला़
या वेळी डॉ. पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच पल्स पोलिओ मोहिमेसाठी २०० रुपये मानधन व ५० रुपये प्रवासभत्त्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रकल्पांत कार्यरत अंगणवाडीताई सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यांच्या स्वत:च्या मानधनात पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने १५ रुपयांची भर घातली आहे. परंतु, आपल्या ग्रामीण व आदिवासी भगिनींनाही न्याय मिळावा म्हणून त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी शैलजा चौधरी, सुनंदा साळवे,अनिता आवळे, ज्योती गायकवाड, विद्या कुकरेजा, मंदा मोरे आदी पदाधिकारी सहभागी होते.