पुणे : शहरातील बुधवार पेठेत परिसरातील रेड लाइट एरियात असलेल्या मालाबाई वाड्यावर फरासखाना पोलिसांनी कारवाई केली. यावेळी अवैधरीत्या देशात वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशीमहिलांना ताब्यात घेतले. त्यांनी देशात येताना पश्चिम बंगाल येथील नागरिक असल्याचा बनाव केल्याचेही पोलिस चौकशीत समोर आले आहे. जहानारा मजिद शेख (४५, रा.मूळ जैशोर, खुलना), शिल्पी बेगम रबिउल्ला शेख (२८, मूळ, ढाका), नुसरात जहान निपा (२८, रा.मूळ, नारायाणगंज), आशा खानामइयर अली (३०, रा.मूळ, नोडाई, कालिया) आणि शिल्पी खालेकमिया अक्तर (२८, रा.रायपुरा, बांगलादेश) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
या महिलांनी बांगलादेशातून छुप्या मार्गाने सीमा ओलांडून देशात प्रवेश केला, तसेच पुण्यात त्या वेश्या व्यवसाय करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यांच्यावर विविध कलमांन्वये फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. त्या दरम्यान शुक्रवारी (दि. १८) दोन पथकांनी बुधवार पेठेत अचानक छापा टाकला. यावेळी या महिला बांगलादेशातून बेकायदेशीर मार्गाने देशात दाखल झाल्याचे आणि वेश्या व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे, अंमलदार मेहबूब मोकाशी, मनिषा पुकाळे, गजानन सोनुने, नितीन तेलंगे, तानाजी नांगरे, महेश राठोड, राजश्री मोहिते, राणी शिंदे, अनिता करदास, अंजली भोईटे, मनिषा कवठे आणि इफ्तेसाम शेख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.