प्रचार संपणार ४८ तास अगोदर
By Admin | Updated: January 28, 2017 00:23 IST2017-01-28T00:23:34+5:302017-01-28T00:23:34+5:30
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीतील आचारसंहितेच्या कलमांमध्ये बदल केला आहे.

प्रचार संपणार ४८ तास अगोदर
पिंपरी : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीतील आचारसंहितेच्या कलमांमध्ये बदल केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेबाबत सुधारित आदेश जारी केला आहे. त्यामध्ये महापालिका निवडणुकांसाठी जाहीर प्रचारबंदीचा कालावधी कोणता राहील, याबाबत स्पष्ट उल्लेख केलेला नाही. मुंबई महापालिका अधिनियमांमध्ये मतदान समाप्तीपूर्वीच्या ४८ तासांमध्ये प्रचाराकरिता कोणतीही सभा घेता येणार नाही.
महापालिकेची आचारसंहितेनंतर पडघम वाजू लागले आहेत. २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसंदर्भात स्पष्ट तरतूद नाही. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेसह इतर महापालिका निवडणुकांमध्ये जाहीर प्रचारबंदीचा कालावधी मतदान समाप्तीच्या आधी ४८ तास इतका राहणार आहे. निवडणुकीसाठी मान्यताप्राप्त राजकीय पक्ष व इतर पक्षांनी जाहीर करावयाच्या महत्त्वाच्या पुढाऱ्यांची संख्या निश्चित केली आहे. १४ आॅक्टोबर २०१६ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेबाबत सुधारित आदेश जारी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसमवेत घेतलेल्या बैठकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या संख्येत वाढ करण्याची विनंती केली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडील मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष व इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्ष अशा एकूण १५ राजकीय पक्षांसाठी स्टार प्रचारकांची संख्या जास्तीत जास्त ४० इतकी ठेवण्यास मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)