दस्तनोंदणीतून साडेचौतीस कोटी

By Admin | Updated: January 5, 2015 00:51 IST2015-01-05T00:51:09+5:302015-01-05T00:51:09+5:30

केवळ महिनाभरातच येथे २ हजार ८४८ दस्तांची नोंदणी झाली असून, त्यापोटी शासनाला ३४ कोटी ५६ लाख २२ हजार ९४५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे

45 crore in circulation | दस्तनोंदणीतून साडेचौतीस कोटी

दस्तनोंदणीतून साडेचौतीस कोटी

पिंपरी : रेडीरेकनरचे दर वाढण्यापूर्वीच कमी दरातच आपले दस्त नोंदवून घेण्यासाठी हवेली उपनिबंधक कार्यालयाच्या अखत्यारित असणा-या पिंपरी - चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प, कासारवाडी तसेच, आकुर्डी प्राधिकरण या कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी डिसेंबरमध्ये मालमत्ता खरेदीदार व विक्रेत्यांची झुंबड उडाल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ महिनाभरातच येथे २ हजार ८४८ दस्तांची नोंदणी झाली असून, त्यापोटी शासनाला ३४ कोटी ५६ लाख २२ हजार ९४५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. वर्षातील उत्पन्नाच्या तुलनेत या महिन्यात ८० टक्के जादा दस्त नोंदविले गेल्याची माहिती उपनिबंधकांकडून पुढे आली आहे.
शहरामध्ये पिंपरी कॅम्प, कासारवाडी, आकुर्डी प्राधिकरण, चिंचवड या ठिकाणी उपनिबंधक कार्यालये आहेत. त्यांमध्ये १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीसाठी इस्टांक (करसंकलनाचे उद्दिष्ट) ठरवून दिलेले असतात. दर महिन्यात किती करसंकलन झाले याची माहिती जमा केली जाते. मात्र सुरूवातीच्या कालावधीत मालमत्तांचे व्यवहार करण्यात शिथिलता असते. दुसऱ्या वर्षासाठी १ जानेवारीपासून रेडी रेकनरचे (मिळकतींचे किमान आधारभूत मुल्य) दर वाढल्याने त्या पटीत जादा कर भरण्याचे टाळण्यासाठी बहुदा जमीन खरेदीदार भूविकासक, बांधकाम व्यावसाईक हे डिसेंबरमध्येच दस्तनोंदणी करण्यावर भर देतात. यासह अनेक सदनीका खरेदी करणारेही याच पद्धतीने नोंदणी करून पुढील वर्षात बांधकाम व्यावसाईकांनी दर वाढविण्याआधी पैसे वाचविण्याचा प्रयत्न करतात. या वृत्तीमुळे वर्षातील इतर कोणत्याही महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमध्ये दस्तनोंदणीचे प्रमाण अडीच ते तिप्पट असते. या वर्षीही तसाच प्रयत्न होत असताना राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचा सर्व्हरमध्ये तीन तासाहून अधिक काळ बिघाड झाला. ज्यांनी शुल्क भरून पावत्या मिळविल्या त्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र यंत्रणा ठप्प झाल्याने अनेकजण ताटकळून माघरी फिरले. परिणामी मागील वर्षांच्या तुलनेत डिसेंबर महिन्यातील हे प्रमाण दुपटीपेक्षा कमीच राहिले. तरीही ठरलेल्या करसंकलनाच्या उद्दिष्टपुर्तीसाठी मिळालेल्या या उत्पन्नाचा मोठा हातभार आहे. पुढील ३ महिन्यात उद्दिष्टपुर्ती होण्याचा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत.
पिंपरी कॅम्पातील उपनिबंधक कार्यालयाला १५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. डिसेंबर अखेर ११५ कोटी रुपये उत्पन्न जमा झाले असून ७६.६६ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. केवळ डिसेंबरमध्ये ९८४ दस्त नोंदणीतून १५ कोटी ४३ लाख ३ हजार ६५० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आकुर्डी कार्यालयास ९० कोटींचे उद्दिष्ट आहे. डिसेबरअखेर ७ हजार ९१५ दस्तनोंदणीतून ७४ कोटी ६७ लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाले असून ८३ टक्के उद्दिष्टपुर्ती झाली आहे. डिसेंबरमध्येच १ हजार १३१ दस्तनोंदणीतून १२ कोटी ५३ लाख ४० हजार ५५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कासारवाडी कार्यालयाला १५० कोटी रुपयांचे करसंकलनाचे उद्दिष्ट आहे. डिसेंबरअखेर ७ हजार ९६५ दस्तनोंदणीतून ७५ कोटी ८६ लाख ७३ हजार २४९ रुपयांचे उत्पन्न मिळाले असून ५०.६७ टक्के उद्दिष्ट गाठण्यात यश आले आहे. डिसेंबरमध्येच ७३३ दस्तनोंदणीतून ६ कोटी ५९ लाख ७९ हजार २४० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 45 crore in circulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.