आरटीओकडून ३२ बस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 21:22 IST2018-05-14T21:22:52+5:302018-05-14T21:22:52+5:30
उन्हाळी सुट्टी किंवा सण-उत्सवाच्या काळात खासगी बसेसमध्ये प्रवाशांकडून वाढीव भाडे घेतले जाते. यापूर्वी शासनाचे कसलेही नियंत्रण नव्हते. त्यामुळे प्रवाशांची लुट होत होती.

आरटीओकडून ३२ बस जप्त
पुणे : प्रवाशांकडून वाढीव भाडे घेण्याच्या तक्रारी आल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने २ ते १४ मे दरम्यान खासगी बस तपासणीची मोहीम राबविली. यामध्ये एकुण ५१८ बसेसची तपासणी करण्यात आली असून ३२ बस जप्त करण्यात आल्या. उन्हाळी सुट्टी किंवा सण-उत्सवाच्या काळात खासगी बसेसमध्ये प्रवाशांकडून वाढीव भाडे घेतले जाते. यापूर्वी शासनाचे कसलेही नियंत्रण नव्हते. त्यामुळे प्रवाशांची लुट होत होती. यापार्श्वभमीवर राज्य शासनाने खासगी बसेसच्या भाडेदरावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एसटी बसेसच्या भाडेदराच्या दीड पटीपेक्षा अधिक भाडे न घेण्याचा नियम करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दि. २८ एप्रिलपासून सुरू झाली. त्यानंतर निश्चित भाडेदरापेक्षा जास्त भाडे घेतल्याच्या तक्रारी आरटीओकडे येवू लागल्या. त्यानुसार दि. २ ते १४ मे या कालावधीत खासगी बस तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये वायुवेग पथकांमार्फत ५१८ बसेसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२५ बसेसवर कारवाई करण्यात आली असून ३२ बस जप्त करण्यात आल्या आहेत. थकीत मोटार वाहन कर, योग्यता प्रमाणपत्र मुदतीत नसणे, विना परवाना वाहतूक करणे अशा विविध कारणास्तव बसेस आरटीओ कार्यालयामार्फत जप्त करून स्वारगेट एसटी आगार, बालेवाडी पीएमपी आगार याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांपैकी १२ वाहनांकडून १ लाख ८९ हजार २०० रुपये तडजोड शुल्क व ६ लाख ५९ हजार ७६१ रुपये वाहन कर असा एकुण ८ लाख ८४ हजार ९६१ रुपयांचा महसूल वसूल करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.