तीन महिन्यांत ३१ अपघात; ६ ठार

By Admin | Updated: July 16, 2014 04:10 IST2014-07-16T04:10:52+5:302014-07-16T04:10:52+5:30

ठेकेदाराच्या बसवरील चालकांना कसलेही प्रशिक्षण नाही, नादुरुस्त बस, समोरील वाहनचालकाच्या चुकीमुळे गेल्या तीन महिन्यांत झालेल्या पीएमपीचे ३१ अपघात झाले

31 accidents in three months; 6 killed | तीन महिन्यांत ३१ अपघात; ६ ठार

तीन महिन्यांत ३१ अपघात; ६ ठार

मंगेश पांडे, पिंपरी
ठेकेदाराच्या बसवरील चालकांना कसलेही प्रशिक्षण नाही, नादुरुस्त बस, समोरील वाहनचालकाच्या चुकीमुळे गेल्या तीन महिन्यांत झालेल्या पीएमपीचे ३१ अपघात झाले असून, ६ जणांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये ठेकेदारी बसचे अपघाताचे प्रमाण अधिक आहे.
सुरक्षित प्रवास म्हणून पीएमपीने प्रवास करण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या वर्षी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत ३१ अपघात झाले. यात ६ जणांचा मृत्यू झाला, तर १० जण गंभीर जखमी झाले. एकूण ३१ अपघातांत ठेकेदारीच्या बसचे १९, तर खात्याच्या बसचे १२ अपघात झाले आहेत.
पदोन्नतीअभावी चालकांना वर्षानुवर्षे आहे त्याच पदावर काम करावे लागते. वेळेवर स्टार्टर अथवा चेकर या पदावर पदोन्नती होत नसल्याने चालकाची क्षमता नसतानाही वाहन चालवावे लागते. पन्नाशीच्या पुढे गेल्यावर नजर कमी होणे, थकवा येणे यासह इतर व्याधी जडतात. यामुळे चालकालाही वाहन चालविणे शक्य होत नाही. या गोष्टी देखील अपघातास कारणीभूत ठरते.
पीएमपी ताफ्यात असलेल्या ठेकेदारीच्या बसवर त्यांचेच चालक आहेत. ठेकेदाराकडून हे चालक नेमताना त्यांना कसलेही प्रशिक्षण दिले जात नाही. प्रवाशांनी भरलेली बस कशी चालवावी, प्रवाशांशी कसे वागावे, प्रवासी बसताना अथवा उतरताना बसचा वेग किती असावा, थांब्यावर बस कशी थांबवावी, याची माहिती नसते. केवळ किलोमीटर पूर्ण करायचे ‘टार्गेट’ या चालकांपुढे असते. यामुळे ठेकेदारीच्या बसच्या अपघातांचा आलेख वाढत आहे. ३ महिन्यांतील अपघातांवरून ठेकेदारीच्या बसच्या अपघातांची संख्या खात्याच्या बसपेक्षा अधिक आहे. पीएमपी व आरटीओच्या वतीने चालकांना प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, यामध्ये सातत्य आवश्यक आहे.

Web Title: 31 accidents in three months; 6 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.