पुणे विमानतळावर ३ किलो १५९ ग्रॅम सोने जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 21:59 IST2017-09-11T21:58:03+5:302017-09-11T21:59:13+5:30
लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सीमा शुल्क विभागाने दुबईहून तस्करी करुन आणलेले एक कोटी रुपये किंमतीचे ३ किलो १५९ ग्रॅम सोने सोमवारी जप्त केले. या प्रकरणी कर्नाटकातील भटकळ गावातील एका व्यक्तीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पुणे विमानतळावर ३ किलो १५९ ग्रॅम सोने जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई
पुणे, दि. 11 - लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सीमा शुल्क विभागाने दुबईहून तस्करी करुन आणलेले एक कोटी रुपये किंमतीचे ३ किलो १५९ ग्रॅम सोने सोमवारी जप्त केले. या प्रकरणी कर्नाटकातील भटकळ गावातील एका व्यक्तीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दुबईहून आलेल्या एका व्यक्तीच्या तपासणीत प्रवासी बॅग आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणात कच्चे सोने लपवून आणले होते. बॅगेच्या तळाशी असलेल्या लाईनमध्ये सोन्याची वायर, तर ईमर्जन्सी एलईडी लाईट उपकरणात ७ बिस्कीट आणि डिजिटल अॅम्पलिफायरमध्ये ५९ गोल्ड प्लेट लपवून आणल्या होत्या. तसेच, मुबंई येथे वास्तव्यास असलेला एक साथीदार विमानतळाच्या बाहेर, वाट पाहत उभा होता. त्याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सीमा शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष दूदपुरी यांनी ही माहिती दिली.
सोने तस्करीत भटकळ गाव सातत्याने समोर येत आहे. या पूर्वी देखील लोहगाव विमानतळावरुन ऑक्टोबर २०११ मध्ये येथील नूर मोईनुद्दीन बाप्पा याला अटक केले होते. भटकळ गाव आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचे केंद्र झाले असल्याचा संशय तपास अधिका-यांना आहे. या तस्करीच्या साखळीत काही कापड व्यवसायिक देखील गुंतले असल्याचा तपास अधिका-यांना दाट संशय आहे.