पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पुढील ३० वर्षांसाठींचा एकात्मिक वाहतूक आराखडा गुरुवारी (दि. ३०) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. तब्बल २०,५५० चौरस मीटर क्षेत्रासाठी हा आराखडा तयार केला असून, यात पुढील ३० वर्षांत २७६ किमीच्या मेट्रो मार्गिका, पीएमआरडीए हद्दीत ६ नवीन बीआरटी मार्गाचे जाळे नियोजित आहे.
आरखड्याची तीन टप्प्यांत अंमलबजावणी होणार असून, १ लाख २६ हजार ४८९ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हा आराखडा तयार करताना विविध शासकीय यंत्रणांचा सहभाग घेण्यात येणार आहे. शहरातील वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली या नव्या मार्गाचे प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविले आहेत. याशिवाय जिल्हा न्यायालय ते शेवाळेवाडी, विद्यापीठ चौक ते देहूरोड, खराडी ते खडकवासाला, निगडी ते चाकण, हडपसर ते सासवड रस्ता, हडपसर ते लोणी काळभोर असा १४८ किमोमीटर मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. याशिवाय जिल्हा न्यायालय ते आळंदी, वाकड चौक ते शेवाळेवाडी, एचसीटीएमआर ते पीसीएमसी, एचसीटीएमआर ते पुणे महापालिका असा १२८ किमी मिळून २७६ किमी मार्ग प्रस्तावित आहे.
दरम्यान, लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपी प्रवासी वाहतुकीत केवळ १० टक्केच वापर होत आहे. तो ६० टक्के वाढविण्याच्या दृष्टीने या आराखड्यात नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पीएमपीला ६ हजार बसची गरज असून, त्यात १ हजार ६२५ ई-बस, तर २०५४ पर्यंत बसची संख्या ११ हजार ५६४ करण्याचे नियोजन केले आहे. तसेच पीएमपीचे ६४१ किमी व १८ नवे बसमार्ग सुचविण्यात आले आहेत. तसेच १० टर्मिनल तयार करण्यात येणार आहे. पीएमआरडीएच्या हद्दीत ६ नवे बीआरटी मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात रावेत ते राजगुरुनगर, गवळी माथा चौक ते शेवाळेवाडी, रावेत ते तळेगाव दाभाडे, चांदणी चौक ते हिंजवडी या ११७ किमी मार्गाबरोबर लोणी काळभोर ते केडगाव, भूमकर चौक ते चिंचवड चौक या ४६ किमी मार्गाचा समावेश आहे.