अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर २५ जोडप्यांची नोंदणी पद्धतीने लग्नगाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:43+5:302021-05-15T04:09:43+5:30
पुणे : अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जात असल्याने यादिवशी हमखास विवाहाचा मुहूर्त गाठण्याचकडे जोडप्यांचा कल ...

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर २५ जोडप्यांची नोंदणी पद्धतीने लग्नगाठ
पुणे : अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जात असल्याने यादिवशी हमखास विवाहाचा मुहूर्त गाठण्याचकडे जोडप्यांचा कल असतो. मात्र, कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेकांच्या मनसुब्यांवर विरजण पडले. अनेकांना विवाह लांबणीवर टाकावा लागला. काहींनी हाच मुहूर्त साधला पण विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन लग्नगाठ बांधली. शुक्रवारी (दि. १४ मे) या मुहूर्तावर जवळपास २५ विवाह झाल्याची माहिती विवाह नोंदणी अधिकारी डी. ए. सातभाई यांनी ‘लोकमत’ला दिली.
‘विवाह’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सुंदर आणि अविस्मरणीय क्षण असतो. आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत लग्नकार्य करण्याची मजा काहीशी वेगळीच असते. मात्र कोरोनाने त्यात मोडता घातला. गेल्या वर्षी अनेकांनी मुहूर्त पाहून विवाहकार्याचे नियोजन केले. त्यात अनेक जोडप्यांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त खास निवडला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील निर्बंधांमुळे विवाहांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. केवळ २५ लोकांच्याच उपस्थितीतच विवाह पार पाडण्याचा नियम अनेकांना जाचक वाटत असल्याने बहुतांश जोडप्यांनी विवाहकार्य लांबणीवर टाकले. काहींनी रद्द करण्याचा मार्ग पत्करला.
त्यामुळे अक्षय तृतीया असूनही गेल्यावर्षीप्रमाणेच मोजके विवाह यंदा झाले. थोडक्यांनी या मुहूर्तावर विवाह पार पाडायचा आणि ही तारीख यादगार करण्याचा निश्चय करून विवाह नोंदणी कार्यालयाकडे धाव घेतली. यातून २५ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. “कोरोना संकटामुळे भव्यदिव्य विवाह सोहळे करण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे कुटुंबीयांचा कल वाढला,” असल्याचे निरीक्षण सातभाई यांनी नोंदवले.
----------
दाते पंचागानुसार मे महिन्यामध्ये विवाहाचे १४ मुहूर्त आहेत. तर एप्रिल ते जुलै या कालावधीत विवाहाचे ४० मुहूर्त आणि मुंजीचे १० मुहूर्त असल्याचे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
-------
शहरामध्ये २५० मंगल कार्यालये, दीडशे लॉन्स, २७५ बँक्वेट हॉल आणि क्लब हाऊस मिळून नऊशे ठिकाणी विवाह सोहळे होतात.
-------
एप्रिल ते जून हा विवाहकार्याचा हंगाम असतो. मुंज, डोहाळे जेवणासारखी सारखी मंगल कार्येदेखील साजरी होतात. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हा सर्व हंगाम हातातून गेला. अनेकांनी विवाह रद्द केले. कोरोनामुळे मंगल कार्यालयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यापुढील काळात मंगल कार्यालये चालवायची तरी कशी, असा प्रश्न आहे.
प्रसाद दातार, संचालक, प्रतिज्ञा मंगल कार्यालय
-----------