दोन्ही मतदारसंघातले २२ हजार २१२ शिक्षक-पदवीधर मतदानात ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:15 IST2020-12-05T04:15:59+5:302020-12-05T04:15:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : समाजातला उच्चशिक्षित घटक शिक्षक आणि पदवीधर मतदार मतदानामध्ये नापास होण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडला. ...

22,212 teachers-graduates from both constituencies 'failed' in polls | दोन्ही मतदारसंघातले २२ हजार २१२ शिक्षक-पदवीधर मतदानात ‘नापास’

दोन्ही मतदारसंघातले २२ हजार २१२ शिक्षक-पदवीधर मतदानात ‘नापास’

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : समाजातला उच्चशिक्षित घटक शिक्षक आणि पदवीधर मतदार मतदानामध्ये नापास होण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडला. पुण्याच्या शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदार संघात तब्बल २२ हजार २१२ मते या उच्चशिक्षितांच्या विविध चुकांमुळे अवैध ठरली आहेत. शिक्षक मतदार संघात वैध आणि अवैध मते निश्चित करण्यासाठी सुमारे १२ तासांचा वेळ गेला तर पदवीधरमध्ये याच कामासाठी तब्बल १८-१९ तासांचा वेळ गेला. उच्चशिक्षितांनी मतदान व्यवस्थित केले असते तर मतमोजणीतला हा बहुमोल वेळ वाचला असता.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात मतदान करताना सुमारे तीन ते चार टक्के मतपत्रिका चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याने बाद ठरल्या. माध्यमिक शिक्षक, पदवीधर मतदार असताना मतदान करताना पसंतीक्रम लिहिण्याऐवजी उमेदवारापुढे त्याचा अनुक्रमांक लिहिणे, आयोगाने दिलेला पेन वापरण्याऐवजी स्वतःच्या पेनाचा वापर करणे, पसंती क्रमांकाऐवजी ‘बरोबर’ अशी खूण करणे, मतपत्रिकेतील मोकळ्या रकान्यात पसंती क्रमांकाऐवजी उमेदवाराच्या नावावरच क्रमांक लिहिणे, ज्या उमेवाराला पहिल्या पसंतीचे मतदान करायचे त्या उमेदवारांच्या समोर पसंती क्रमांक एक लिहिण्याऐवजी त्याच उमेदवाराचा क्रमांक लिहीणे, एकाच वेळी अनेक उमेदवारांना एकाच क्रमांकाची पसंती देणे अशा ‘चुका’ शिक्षित मतदारांनी केल्या.

चौकट

-शिक्षक मतदार संघात एकूण ५२ हजार २८७ शिक्षकांनी मतदान केले. त्यापैकी २ हजार ७८४ मते अवैध ठरली. एकूण ५० हजार २२६ वैध मते ठरली. यामुळे शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंतीत निवडून येण्यासाठी २५ हजार ११४ हा मतांचा कोटा निश्चित झाला.

-पदवीधर मतदार संघात एकूण २ लाख ४७ हजार ६८७ मतदान झाले. त्यापैकी तब्बल १९ हजार ४२८ मते बाद ठरली. वैध मतांची संख्या २ लाख २८ हजार २५९ झाली. त्यामुळे पहिल्या पसंतीत निवडून येण्यासाठी १ लाख ११ हजार ३७ हा मतांचा कोटा निश्चित झाला.

-----

एक मतपत्रिकेसाठी लागली दीड-दोन मिनिटे

पुणे विभाग पदवीधर मतदार संघात ६२ आणि शिक्षक मतदार संघात ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामुळे या दोन्ही मतदार संघाची जम्बो मतपत्रिका सुरूवातीपासूनच चर्चेचा ठरली. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानासाठी एक मिनिट तर मतमोजणीच्या दिवशी वैध-अवैध मते ठरविण्यासाठी यंत्रणेला एका मतपत्रिकेसाठी तब्बल दीड-दोन मिनिट लागले. यामुळे शुक्रवारी सायंकाळी साडेसातपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: 22,212 teachers-graduates from both constituencies 'failed' in polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.