पुणे : शहरासह जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) आज नव्याने एक रुग्ण सापडला असून, एकूण रुग्णसंख्या २१२ इतकी झाली आहे. त्यामध्ये १८३ जणांना जीबीएसची लागण झाल्याचे निश्चित झाले असून, २७ रुग्ण संशयित आहेत.
आत्तापर्यंत जीबीएसच्या १५२ रुग्णांना डिस्चार्ज दिले असून, गेल्या २४ तासांत आठ रुग्ण बरे होऊन घरी गेले. गुरुवारी जीबीएसमुळे आज एकही मृत्यूची नोंद नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ११ इतकी असून, त्यातील चार जणांचा मृत्यू हा जीबीएसमुळे झाल्याचे निश्चित झाले आहे, तर सात मृत्यू हे जीबीएस संशयित आहेत. दरम्यान, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात एकूण २१२ रुग्णसंख्या असून, ४२ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून, सर्वाधिक रुग्णसंख्या (९५) ही समाविष्ट गावांतील आहे. ३२ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, ३३ रुग्ण पुणे ग्रामीण, १० रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. सध्या ३२ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असून, १६ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.