सांगलीच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेचे १०० स्वच्छता कर्मचारी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 21:09 IST2019-08-10T21:06:58+5:302019-08-10T21:09:40+5:30
रस्त्यांवर आणि गल्ली बोळातील गाळ, कचरा साफ करण्यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच पालिकेच्या कर्मचाºयांनी जमा केलेले धान्य, संसारोपयोगी वस्तू आणि कपडे सांगलीला पाठविण्यात येत आहेत.

सांगलीच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेचे १०० स्वच्छता कर्मचारी रवाना
पुणे : पुराने थैमान घातलेल्या सांगली जिल्ह्यामधील सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुणे महापालिका सरसावली असून तब्बल १०० स्वच्छता कर्मचाºयांचे पथक शनिवारी संध्याकाळी रवाना झाले. सांगलीमधील पाणी ओसरत असून तेथील रस्ते प्रामुख्याने स्वच्छ करुन देण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विविध यंत्रणांच्या बैठकीमध्ये पुणे महापालिकेने शक्य होईल तेवढी मदत करावी असे आवाहन केले होते. पुण्यातील मदत व बचाव कार्यात अडथळा येणार नाही अगर मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही याची काळजी घेऊन मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे महापालिकेचे १०० स्वच्छता कर्मचारी आणि काही अधिकारी सांगलीला जाणार आहेत. स्वच्छतेसाठी लागणारे फावडे, घमेली, झाडूसह सर्व साहित्य या कर्मचाºयांनी सोबत घेतले आहे. सांगली महापालिकेने जेटींग मशीन उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार एक जेटींग मशीनही पाठविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे मोळक म्हणाले. रस्त्यांवर आणि गल्ली बोळातील गाळ, कचरा साफ करण्यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच पालिकेच्या कर्मचाºयांनी जमा केलेले धान्य, संसारोपयोगी वस्तू आणि कपडे सांगलीला पाठविण्यात येत आहेत. पालिकेच्या कर्मचाºयांनी कर्तव्यासोबतच माणुसकी जपली असून पालिका आयुक्तांनी या उपक्रमाचे कौतूक केले आहे.