राज्यात होणार १ लाख भूजल प्रशिक्षित स्वयंसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:08 IST2021-06-20T04:08:34+5:302021-06-20T04:08:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात १ लाख प्रशिक्षित भूजल संवर्धन ...

1 lakh groundwater trained volunteers to be formed in the state | राज्यात होणार १ लाख भूजल प्रशिक्षित स्वयंसेवक

राज्यात होणार १ लाख भूजल प्रशिक्षित स्वयंसेवक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात १ लाख प्रशिक्षित भूजल संवर्धन स्वयंसेवक तयार करणार आहेत. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात भूजल संवर्धन, सरंक्षण जागरूकता वाढावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

सुवर्णमहोत्सवी वर्षात काहीतरी प्रत्यक्ष कृती व्हावी या विचारातून संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे. त्याची सुरुवात झाली असून राज्याच्या प्रत्येक विभागात हा प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.

पदवी, पदव्युत्तर प्राप्त ५० हजार विद्यार्थी व ग्रामपंचायत, ग्रामपाणीपुरवठा, महिला बचतगट, पाणी वापर संस्था यातील ५० हजार कार्यकर्ते, अशा १ लाख जणांंना भूजलासंबंधीची सर्व शास्त्रीय माहिती यात देण्यात येत आहे.

डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले की, कार्यालयातील वरिष्ठ भूवैज्ञानिक, शास्त्रज्ञ, जलक्षेत्रात काम करणारे अनुभवी पदाधिकारी हे प्रशिक्षण देतात. त्यामध्ये विहीर पुनर्भरण, विंधनविहीर पुनर्भरण व छतावरील पाण्याची साठवणूक यावर भर आहे. त्याशिवाय जिल्ह्याची भौगोलिक जलस्थिती, जलव्यवस्थापन, वापर ताळेबंद याचीही जोड देण्यात आली आहे.

प्रशिक्षणानंतर लगेच कृती कार्यक्रम देऊन काही दिवसांनी त्याची माहितीही घेतली जाते. आतापर्यंत ५२ प्रशिक्षणे झाली असून, त्यातून ३ हजार ५०० जण प्रशिक्षित झाले आहेत. आता याचा वेग वाढवण्यात येत असून, जुलै अखेरीस राज्यात असे १ लाख प्रशिक्षित युवक-युवती तयार करण्याचा संकल्प आहे, असे डॉ. कलशेट्टी म्हणाले.

Web Title: 1 lakh groundwater trained volunteers to be formed in the state