मुंबई महानगरपालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढणार? की... अजित पवारांचं मोठं विधान...
By बाळकृष्ण परब | Updated: January 7, 2021 13:06 IST2021-01-07T12:55:37+5:302021-01-07T13:06:47+5:30
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीबाबत सूचक आणि मोठे विधान केले आहे.

मुंबई महानगरपालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढणार? की... अजित पवारांचं मोठं विधान...
मुंबई - देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता केवळ वर्षभराचा अवधी राहिला आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने कंबर कसली आहे. काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत तर गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेतील सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून ही निडणूक महाविकास आघाडी करून लढण्याबाबत चाचपणी सुरू आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीबाबत सूचक आणि मोठे विधान केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करून लढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहे.
मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीच्या रणनीतीबाबत अजित पवार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमध्ये आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मित्रपक्षांसोबत मिळून ही निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू आहे. मात्र या बाबतचा अंतिम निर्णय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे घेणार आहेत. आघाडी करून लढल्याने मतविभागणी रोखता येईल. अन्यथा तुला नाही मला, दे तिसऱ्याला असं होईल, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत काँग्रेसचे नेते देत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी सांगितले की याविषयावर आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढणार आहोत.
सध्या मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. २०१७ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना मोठा पक्ष ठरला होता. मात्र त्या निवडणुकीत भाजपाने मोठी मुसंडी मारत दुसरे स्थान पटकावले होते. तर काँग्रेसची तिसऱ्या क्रमांकावर घसरगुंडी उडाली होती.