सत्तेत आल्यास गरीब कुटुंबाला दरवर्षी ७२ हजार; इंदिरांनंतर राहुल गांधींचे 'गरिबी हटाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 14:38 IST2019-03-25T14:19:13+5:302019-03-25T14:38:32+5:30

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींची मोठी घोषणा

Will Give 20 percent Poorest Families Rs 72000 Every Year if Voted to Power Says Rahul Gandhi | सत्तेत आल्यास गरीब कुटुंबाला दरवर्षी ७२ हजार; इंदिरांनंतर राहुल गांधींचे 'गरिबी हटाव'

सत्तेत आल्यास गरीब कुटुंबाला दरवर्षी ७२ हजार; इंदिरांनंतर राहुल गांधींचे 'गरिबी हटाव'

नवी दिल्ली: काँग्रेसनं पुन्हा एकदा 'गरिबी हटाव'चा नारा दिला आहे. सत्तेस आल्यास प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ श्रीमंत उद्योगपतींना मदत करतात. मात्र आम्ही गरिबांना मदत करणार आहोत, असं राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत म्हटलं. काँग्रेसचं सरकार आल्यावर गरिबांना न्याय मिळेल, असं ते म्हणाले. 







आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी 72 हजार रुपये देण्यात येतील. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. देशातील 5 कोटी कुटुंबांना, म्हणजेच जवळपास 25 कोटी लोकांना याचा फायदा होईल, असा दावा राहुल गांधींना केला. जगातील कोणत्याही देशात अशी योजना नाही, असा दावादेखील त्यांनी केला. 'काँग्रेसनं जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन आम्ही ही योजना तयार केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात टप्प्याटप्प्यात ही योजना लागू करण्यात येईल,' अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. 




महिन्याकाठी 12 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळेल. किमान उत्पन्न हमी योजनेच्या अंतर्गत ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असं राहुल यांनी सांगितलं. सर्व जाती-धर्माच्या कुटुंबांना या योजनेला लाभ मिळेल. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना न्याय मिळेल, असं राहुल पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा संदर्भ दिला. गेल्या डिसेंबरमध्ये आम्ही तिन्ही राज्यांमध्ये विजयी झालो. त्यानंतर लगेचच अवघ्या काही दिवसांमध्ये तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली, असं राहुल म्हणाले. आम्ही मनरेगा यशस्वी लागू केली. त्यामुळे किमान उत्पन्न हमी योजनादेखील उत्तमपमे राबवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Web Title: Will Give 20 percent Poorest Families Rs 72000 Every Year if Voted to Power Says Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.