माझ्या मुलांसह इतरांच्या मुलांचेही लाड करतो; उद्धव यांचा पवारांना टोला, आदित्यच्या उमेदवारीबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 02:18 PM2019-03-13T14:18:08+5:302019-03-13T14:52:26+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर भाष्य केलं आहे.

uddhav thackeray commentry on sharad pawar over sujay vikhe patils entry in bjp | माझ्या मुलांसह इतरांच्या मुलांचेही लाड करतो; उद्धव यांचा पवारांना टोला, आदित्यच्या उमेदवारीबाबत खुलासा

माझ्या मुलांसह इतरांच्या मुलांचेही लाड करतो; उद्धव यांचा पवारांना टोला, आदित्यच्या उमेदवारीबाबत खुलासा

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्यालोकसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरे हे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. माझ्या मुलांबरोबर मी इतरांच्याही मुलांचे हट्ट पुरवतो, इतरांच्या पोरांचाही मी विचार करतो, दुसऱ्यांची पोरं धुणीभांडी करण्यासाठी वापरून घेत नाही. त्यामुळे शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच लवकरच लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सुजय विखे-पाटील मातोश्रीवर भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांकडून दगाफटका होणार नसल्याचंही मी सुजयला सांगितलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शरद पवार अष्टपैलू आहेत. पण भविष्य कधीपासून सांगायला लागले माहीत नाही. पवारसाहेब जे बोलतात त्याच्याविरुद्ध करतात, तर आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. 
 
युवासेनेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणूक लढवायचीच असेल, तर त्यांनी ती ठाणे लोकसभा मतदारसंघातून लढवावी, अशी मागणी युवा सैनिकांनी पक्षनेतृत्वाकडे केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेसाठी सुरक्षित मतदारसंघ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पहिली सत्ता ठाण्याने मिळवून दिल्याने, ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल, तर तिने ठाण्याचा विचार करावा, असे युवा सैनिकांचे म्हणणे होते.

आदित्य हे लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध होताच, ठाण्यातील युवा सैनिकांमध्ये चर्चेचा व औत्सुक्याचा विषय ठरला. सोशल मीडियावर युवा सैनिकांनी हे वृत्त शेअर केले. त्यातूनच आदित्य यांनी ठाण्यातून निवडणूक लढवावी, अशी मागणी पुढे आली. उत्तर-मध्य मतदारसंघातून आदित्य निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी वृत्तात दिली आहे, परंतु त्यापेक्षा ठाणे लोकसभा मतदारसंघ अधिक सुरक्षित आहे व ठाणेकरांचे सेनेवर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम असल्याने आदित्य यांनी येथून विजयश्री मिळवावी, असे युवा सैनिकांना वाटते.

Web Title: uddhav thackeray commentry on sharad pawar over sujay vikhe patils entry in bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.