"एक काळ असा होता की, काँग्रेसने दगड उभा केला तरी लोक त्याला निवडून देत होते, पण आज..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:41 PM2021-05-12T12:41:38+5:302021-05-12T12:43:33+5:30

सामना वाचत नसल्याच्या टीकेलाही शिवसेनेने दिलं उत्तर.

shiv sena saamna editorial commented on sonia gandhis comment meeting rahul gandhi | "एक काळ असा होता की, काँग्रेसने दगड उभा केला तरी लोक त्याला निवडून देत होते, पण आज..."

"एक काळ असा होता की, काँग्रेसने दगड उभा केला तरी लोक त्याला निवडून देत होते, पण आज..."

googlenewsNext
ठळक मुद्देसामना वाचत नसल्याच्या टीकेलाही शिवसेनेने दिलं उत्तर.सोनिया यांनी पक्षाच्या दुर्गतीवर व्यक्त केलेली चिंता व अस्वस्थता दुर्लक्षित करता येणार नाही : शिवसेना

'देशात कोरोनाचे संकट आहे. हे कारण देऊन काँग्रेस अध्यक्षपदाची निवड सलग तिसऱ्यांदा टाळण्यात आली. त्यामुळे सोनिया गांधी याच पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत राहतील. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यापासून ते रिकामेच आहेत. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचे मत काँग्रेसमधील ‘जी-२३’ गटाने वारंवार मांडले. पक्षाला अध्यक्ष नसल्याने लोकांसमोर कसे जायचे, हा मुद्दा या बंडखोर गटाने उपस्थित केला, पण अध्यक्ष असला नसला तरी पक्ष हा चालतच असतो,' असं शिवसेनेने म्हटले आहे.

'जमिनीवरचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा पुढे नेत असतात. एक काळ असा होता की, काँग्रेसने निवडणुकीत दगड उभा केला, तरी लोक त्या दगडास निवडून देत होते. आज चित्र तसे नाही,' असे म्हणत शिवसेनेने काँग्रेसच्या सद्य परिस्थितीवर भाष्य केले आहे. शिवेसेनेने सामनाच्या संपादकीयमधून यावर भाष्य केले. 

काय म्हटलंय अग्रलेखात ?

एक काळ असा होता की, काँग्रेसने निवडणुकीत दगड उभा केला, तरी लोक त्या दगडास निवडून देत होते. आज चित्र तसे नाही. सोनिया गांधी यांनी कार्य समितीच्या बैठकीत तोच मुद्दा उपस्थित केला. विधानसभा निवडणुकांतील निराशाजनक कामगिरीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. निकाल इतके निराशाजनक आहेत की, पक्षात काही दुरुस्त्या कराव्या लागतील. महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आपण ‘सामना’ वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा दिसून आले.

सोनिया यांनी पक्षाच्या दुर्गतीवर व्यक्त केलेली चिंता व अस्वस्थता दुर्लक्षित करता येणार नाही. मानवी जीवनात वाईट पुष्कळ असते, चांगले थोडे असते. संस्थेच्या जीवनात चांगले पुष्कळ असू शकते, वाईट कमी असू शकते. व्यक्ती अगर संस्था यांच्या जीवनात जेव्हा संघर्ष उभा राहतो व त्यास तोंड देण्यासाठी जेव्हा ते सर्व सामर्थ्यानिशी उभे राहतात आणि आयुष्याची बाजी लावून लढतात, तेव्हा ते सारे मोठे होतात. दुबळे असून कसे रणधुरंधर योद्धय़ासारखे लढतात. काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य लढय़ातून लोकांत व देशात रुजला. स्वातंत्र्य लढय़ातील संघर्षाने अनेक सामान्य कार्यकर्तेही मोठे झाले, पण त्या छोटय़ांचे नेतृत्व करणारी मंडळी थोर होती. 

सध्याच्या सरकारविषयी लोकांच्या मानात रोष निर्माण होतोय. बेरोजगारी, अर्थसंकट, महागाई, कोरोनामुळे पडलेल्या प्रेतांचा खच यामुळे केंद्र सरकारची लोकप्रियता घसरणीला लागली. अशा वेळी देशभरातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी ‘ट्विटर’च्या फांद्यांवरून उतरून मैदानात उतरणे गरजेचे आहे. पुन्हा मैदानावर उतरणे म्हणजे कोरोना काळात गर्दी करणे नाही. तर सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडणे, हे एक महत्त्वाचे काम सर्वच विरोधी पक्षांना रोज करावे लागेल. काँग्रेसने त्या कामी पुढाकार घ्यावा. सोनियांना बहुधा हाच संदेश द्यायचा असावा!

Web Title: shiv sena saamna editorial commented on sonia gandhis comment meeting rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.