"कंगना मुंबईत आली तर तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही"; शिवसेना आमदाराची थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 02:39 PM2020-09-04T14:39:00+5:302020-09-04T14:45:32+5:30

शिवसेना, काँग्रेस, भाजपासह मनसेनेही तिच्या विधानावर आक्षेप घेत तिला इशारा दिला आहे. पण त्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट कंगनाला ट्विटरवरुन धमकी दिली आहे.

Shiv Sena MLA Pratap Sarnaik direct threat to Kangana Ranaut | "कंगना मुंबईत आली तर तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही"; शिवसेना आमदाराची थेट धमकी

"कंगना मुंबईत आली तर तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही"; शिवसेना आमदाराची थेट धमकी

Next
ठळक मुद्देमुंबई पोलिसांवरील विधानामुळे कंगनावर शिवसेनेने केली होती टीका मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने कंगनाविरोधात संताप कंगना मुंबईत आली तर तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही - शिवसेना

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबई पोलिसांवर केलेल्या विधानानंतर खासदार संजय राऊत यांनी तिच्यावर टीका केली होती. त्यानंतर कंगनाने संजय राऊत उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी देत आहेत असा आरोप करत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यावरुन आता तिच्याविरोधात संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

शिवसेना, काँग्रेस, भाजपासह मनसेनेही तिच्या विधानावर आक्षेप घेत तिला इशारा दिला आहे. पण त्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट कंगनाला ट्विटरवरुन धमकी दिली आहे. ते म्हणाले की, कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना  पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे असं त्यांनी सांगितले आहे.

तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगनावर निशाणा साधला आहे. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, याचबरोबर, मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत. त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला.

याशिवाय, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही. आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का? महाराष्ट्राच्या अस्मितेवर जी लोकं मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांना पक्षाला लाज वाटली पाहिजे. त्या पक्षाला मुंबईत मतदान मागण्याचा अधिकार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर निशाणा साधला. तसेच, मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्यांना पाठीशी घालणारे जे कोणी आहेत, त्यांना मुंबईत मतं मागताना लाज वाटली पाहिजे, तुम्हाला POK ने मतं दिली का?” असा सवाल संजय राऊत यांनी भाजपाला केला.

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

काँग्रेस-भाजपात जुंपली

महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजपा करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपाने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे. राम कदम यांची नार्को टेस्ट करावी. कंगना टीम म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजपा आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आमची मुंबईवर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे असा आरोप काँग्रेसचे सचिन सावंत यांनी केला होता. त्यावर भाजपाचे राम कदम यांनीही उत्तर दिले होते.

राम कदम म्हणाले की, छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे उद्या नव्हे ,या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. तयार आहे पण मात्र या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते, मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का ? ते तपासून पहा असा टोला त्यांनी लगावला तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बडे नेते अभिनेते आणि ड्रग माफिया यांना महाराष्ट्र सरकारचा वाचवण्याचा प्रयत्न संपूर्ण देश दुनियाने पाहिला. या कालखंडात आक्रमकपणे सुशांतला न्याय मिळावा म्हणून आम्हा सर्वांची  प्रामाणिक धडपड संपूर्ण देशाने पाहिली हेच सरकारच्या जिव्हारी लागलं असंही आमदार राम कदम यांनी आरोप केला होता.

Web Title: Shiv Sena MLA Pratap Sarnaik direct threat to Kangana Ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.