गोव्यात रिव्होल्युशनरी गोवन्सचा राजकीय पक्ष महिना अखेरीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 21:06 IST2021-01-21T21:03:47+5:302021-01-21T21:06:23+5:30
revolutionary goans : मिरामार- पणजी येथे संघटनेच्या पहिल्या कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले.

गोव्यात रिव्होल्युशनरी गोवन्सचा राजकीय पक्ष महिना अखेरीस
पणजी : रिवोलुशनरी गोवन्स (आरजी) ही गोमंतकीयांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारी संघटना आपला राजकीय पक्ष याच महिन्याच्या अखेरीस जाहीर करील, असे संघटनेचे प्रमुख मनोज परब यांनी गुरुवारी येथे जाहीर केले. मिरामार- पणजी येथे संघटनेच्या पहिल्या कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले.
उमेदवार निवड ही लोकच करतील. लोकांनी निवडीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन परब यांनी कार्यालय उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना केले. आम्ही अनेक मतदारसंघात यापूर्वीच काम सुरू केले असून प्रत्येक ठिकाणी उमेदवार म्हणून काही युवकांच्या नावांची लघु यादी तयार केली आहे. लोकांनी योग्य असे उमेदवार निवडण्याविषयी सक्रीयता दाखवावी, आम्ही लोकांवर उमेदवार थोपवरणार नाही. लोकांनी उमेदवार निवडल्यानंतर लोकच त्या उमेदवाराच्या विजयासाठी मोफत काम करतील, असे परब म्हणाले.
आमच्या पक्षाच्या नोंदणीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण होताच पक्ष जाहीर करू. बुथस्तरावर आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. प्रभागनिहाय बैठकाही होत आहेत. अलिकडे सरकारी यंत्रणेने आम्हाला सभा घेण्यासाठी चार ठिकाणी परवानगी नाकारली. एके ठिकाणी परवानगी मिळाली आहे, असे परब यांनी सांगितले.
आमचे उमेदवार हे चांगल्या वर्तनाचे, चांगल्या चारित्र्याचे असतीलच पण त्यांच्याकडे नेतृत्व गुण आहेत की नाहीत व ते काम करण्याच्या क्षमेतेचे आहेत की नाही हे पाहिले जाईल. लोकांशी त्यांचे संबंध कसे आहेत हेही तपासून पाहिले जाईल. केवळ चांगले गुण असले म्हणूनच होत नाही तर काम करण्याची क्षमता असावी लागते, असे परब म्हणाले. पर्सन ऑफ गोवन ओरिजीन विधेयक आम्ही आणणार आहोत.
तसेच गोमंतकीयांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला सत्तेवर यायचे आहे. आम्ही लोकांसमोर जाताना विविध विषयांबाबत रिवोलुशनरी गोवन्सचे व्हीजन व रोडमेप लोकांसमोर मांडणार आहोत. आम्ही केवळ प्रश्न उपस्थित करून थांबणार नाही तर आम्ही त्यासाठी सत्तेवर आल्यानंतर काय करणार आहोत ते लोकांसमोर व्यवस्थित मांडू. रोजगार, पर्यावरण, वीज, पाणी पुरवठा अशा प्रत्येक विषयाबाबत आमचा रोडमेप असेल, असे परब यांनी सांगितले.