मुंबईकडे निघालेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी घरीच केले स्थानबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 06:13 IST2020-11-16T06:13:44+5:302020-11-16T06:13:57+5:30
पोलीस आयुक्त कार्यालयात दोघांचाही ठिय्या

मुंबईकडे निघालेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी घरीच केले स्थानबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा दाम्पत्याला मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंना भेटण्यासाठी रविवारी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या घरी स्थानबद्ध केले. त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयात दोघांनी काही काळ ठिय्या दिला.
गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रास्ता रोको केल्याप्रकरणी शुक्रवारी आमदार राणा यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आधी जामीन न स्वीकारणाऱ्या आमदार राणा यांनी रविवारी जामीन घेतला. सायंकाळी विदर्भ एक्स्प्रेसने राणा दाम्पत्य शेतकरी कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना होणार होते. तत्पूर्वी मुंबई पोलीस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशानुसार राणा दाम्पत्याला मुंबई येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला.
राणा दाम्पत्याने जाण्याची भूमिका कायम ठेवल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४९ नुसार दोघांनाही त्यांच्याच घरी स्थानबद्ध केले. विदर्भ एक्स्प्रेस सुटेपर्यंत ते पोलिसांच्या ताब्यात होते. त्यानंतर त्यांना सोडल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. परंतु, आम्ही पोलीस आयुक्तालयातच थांबू, अशी भूमिका या दाम्पत्याने रात्री ९.१५ वाजता घेतली. दरम्यान, नवनीत राणा यांच्या नेतृत्वात शनिवारी तुरुंगासमोर आणि रविवारी राजकमल चौकात निदर्शने करण्यात आली. बडनेरा येथे विदर्भ एक्स्प्रेसमध्ये चढू पाहणाऱ्या काही कार्यकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले.