Ramdas Kadam accuses a Shiv Sena minister of Konkan | रामदास कदम यांचा शिवसेनेच्याच काेकणातील एका मंत्र्यावर आरोप 

रामदास कदम यांचा शिवसेनेच्याच काेकणातील एका मंत्र्यावर आरोप 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी विधान परिषदेत आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर निशाणा साधला. रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची चौकशी चालू आहे. ही चौकशी थांबवावी यासाठी कोकणातील शिवसेनेचा एक मंत्री गृह राज्यमंत्र्यांवर दबाव टाकत आहे. या अधिकाऱ्यावर मंत्र्यांचा वरदहस्त असल्यानेच कारवाई होत नसल्याचा आरोपही कदम यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.


प्रश्नोत्तराच्या तासात हुक्का पार्लरसंदर्भात उपस्थित प्रश्नावर चर्चा सुरू असताना कदम यांनी रत्नागिरीतील मुद्दा उपस्थित केला. कदम म्हणाले की, कोरोना काळात देवळे आणि शाळा बंद आहेत. पण, रत्नागिरीत दिवसरात्र क्रिकेटला कशी परवानगी मिळते. हजारोंची गर्दी होते. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की शासकीय अधिकारी असून त्यांचे फोटो बॅनरवर लागले. हजारोंच्या गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत त्या उपस्थित होत्या. कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. याबाबत फोटोसह गृहमंत्र्यांना सहावेळा पत्र दिले. पण, त्यांना याची दखल घ्यावीशी वाटली नाही. शिवसेनेचे गृह राज्यमंत्री असूनही तेही या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत.


विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्या मंत्र्यांचे नाव जाहीर करण्याचे आवाहन केले. यावर, नोटीस देऊन मी त्या मंत्र्याचे सभागृहात नाव घेऊ शकतो. मला कोणती अडचण नाही असे सांगतानाच तुमच्यावर कोणाचा दबाव नसेल तर या अधिकाऱ्यावर कारवाई करा, असे आव्हान त्यांनी अनिल देशमुख यांना दिले. मला विधानभवन पायऱ्यांवर उपोषणाला बसायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला. यावर, कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Ramdas Kadam accuses a Shiv Sena minister of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.