Rajya Sabha: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ; आपचे ३ खासदार निलंबित, मार्शलनं काढलं बाहेर
By प्रविण मरगळे | Updated: February 3, 2021 11:51 IST2021-02-03T10:44:46+5:302021-02-03T11:51:58+5:30
आपच्या खासदारांना मार्शलच्या मदतीने सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. या तिन्ही खासदारांना सभागृहाच्या कामकाजातून एक दिवसासाठी निलंबित करण्याचे आदेश सभापतींनी दिले.

Rajya Sabha: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ; आपचे ३ खासदार निलंबित, मार्शलनं काढलं बाहेर
नवी दिल्ली – दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद राज्यसभेत उमटले आहेत. बुधवारी राज्यसभेत शेतकरी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं, सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या ३ खासदारांना निलंबित करण्यात आलं, आपचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वेलमध्ये पोहचले, आप खासदारांच्या घोषणाबाजी आणि गदारोळ पाहून अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले.
त्यानंतर आपच्या खासदारांना मार्शलच्या मदतीने सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. या तिन्ही खासदारांना सभागृहाच्या कामकाजातून एक दिवसासाठी निलंबित करण्याचे आदेश सभापतींनी दिले. तत्पूर्वी ३ कृषी विधेयकांना मागे घेण्यासाठी आणि शेतकरी मुद्द्यावरून राज्यसभेचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते, पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आपच्या संजय सिंह, सुशील गुप्ता आणि एनडी गुप्ता या ३ खासदारांना सदनाच्या बाहेर जाण्यास सांगितले, परंतु खासदारांचा गोंधळ तसाच सुरू होता, अखेर या तिन्ही सदस्यांना एक दिवसासाठी निलंबित करत मार्शल बोलावून त्यांना सभागृहाच्या बाहेर काढले.
ही हुकूमशाही चालणार नाही, अध्यक्षांनी बजावलं
राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू म्हणाले की, जेव्हा शेतकरी विषयावर चर्चा करण्याची वेळ आली आहे, तेव्हा ही घोषणाबाजी का केली जात आहे.? ही हुकूमशाही चालणार नाही असं नायडू यांनी बजावलं, आम आदमी पक्षाच्या वतीने संजय सिंह, एनडी गुप्ता आणि सुशील गुप्ता राज्यसभेत खासदार आहेत.
शेतकर्यांच्या प्रश्नावर कामकाज तहकूब करण्याची नोटीस
तत्पूर्वी, कॉंग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सभागृहाचं कामकाज तहकूब ठेवण्याची नोटीस सादर केली. बसपा, सीपीआय, टीएमसी, द्रमुक, सीपीआय-एम यांनीही तहकूब करण्याचा प्रस्ताव दिला.