राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 19:51 IST2019-01-21T19:49:29+5:302019-01-21T19:51:35+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार ?
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्यावतीने आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता एका वृत्तवाहिनीने वर्तविली आहे. रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचे गड मानले गेले आहेत. यातच तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघाचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी नांदेड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणूक सोनिया गांधी कदाचित लढवणार नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवितील असे संकेत मिळत आहेत.
राहुल गांधी यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक अमेठी या त्यांच्या बालेकिल्ल्यातून लढविली होती. मात्र तेथे भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली. या मतदार संघातून पुन्हा स्मृती इराणी याच भाजपाच्या उमेदवार असतील असेही सांगितले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी नांदेड आणि रायबरेली मतदार संघाचा पर्याय असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, राहुल गांधी देशाच्या कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवू शकतात, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.