आयुक्त तुकाराम मुंढेंना भोवली नितीन गडकरींची नाराजी! बदलीसाठी झाला 'अदृश्य' करार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 01:40 AM2020-08-27T01:40:31+5:302020-08-27T07:09:00+5:30

स्मार्ट सिटीतील हस्तक्षेप भोवला, मुुंंढे यांची १५ वर्षांत १४ वेळा झाली बदली!

Nitin Gadkari's displeasure around Tukaram Mundhe! An 'invisible' agreement was reached | आयुक्त तुकाराम मुंढेंना भोवली नितीन गडकरींची नाराजी! बदलीसाठी झाला 'अदृश्य' करार 

आयुक्त तुकाराम मुंढेंना भोवली नितीन गडकरींची नाराजी! बदलीसाठी झाला 'अदृश्य' करार 

Next

नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आणि हेकेखोरपणा हेच तुकाराम मुंढे यांना महापालिका आयुक्त पदावरून हटविण्यामागील एक मोठे कारण ठरले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पावर ज्या पद्धतीने मुंढे यांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यावरून ज्येष्ठ केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी खूप नाराज होते. हीच नाराजी मुंढे यांना भारी पडली आणि त्यांना नागपुरातून जावे लागले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंढे यांनी जेव्हापासून नागपूर महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला तेव्हापासूनच ते इतर अधिकाऱ्यांनाच नव्हेतर, राजकीय नेत्यांनाही काही मोजत नव्हते. त्यांनी असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला की, सर्व राजकीय नेते भ्रष्ट आहेत आणि ते स्वत: जनतेच्या हिताचे काम करीत आहेत. महापालिकेत जो भ्रष्टाचार पसरला आहे तो संपविण्याचे काम ते करीत आहेत. त्यांच्या या हेकेखोरपणामुळे अधिकारीही आश्चर्यचकित होते. इतकेच नव्हेतर, विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांची बैठकही ते मध्येच सोडून निघून जायचे.

बैठकीत जी काही चर्चा व्हायची, त्याबाबत ते लगेच मुंबईला कळवायचे. यावरून ते असे दाखविण्याचा प्रयत्न करायचे की, जे काही होत आहे ते स्वत:च करीत आहेत. इतर अधिकारी काहीही करीत नाहीत. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये सहकार्याचे वातावरण राहिले नाही.
सूत्रानुसार, मुंढे यांनी पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांच्याबाबत षड्यंत्र रचले आणि मुख्यमंत्र्यांचे असे कान भरले की ते निवडणुकीत भाजपचे उमेदवार होऊ शकतात.

यानंतर पोलीस आयुक्तांच्या बदलीचे वृत्त झपाट्याने पसरले. परंतु गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हस्तक्षेप केला. मला न कळवता पोलीस आयुक्तांची बदली कशी होऊ शकते, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उपाध्याय यांच्या बदलीचे प्रकरण शांत झाले. असे म्हटले जाते की, भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना त्रास देण्यासाठी मुंढे यांना नागपूरला पाठविण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले महापौर संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे उघड युद्ध सुरू होते. नागनदीसाठी गडकरी यांनी निधी आणला होता. मोहम्मद इजराईल या अधिकाºयाच्या नेतृत्वात हे काम सुरू होते त्यांनाच मुंढे यांनी हटवले. मुंढे यांनी गडकरींचेही ऐकले नाही व त्यांना हटवले. शहरातील बºयाच मुद्द्यांवर त्यांनी गडकरी यांना विश्वासात घेतले नाही. यामुळे गडकरी नाराज होते.

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प ही गडकरींचीच देण आहे. त्यांनीच हा प्रकल्प आणला. मात्र या प्रकल्पाच्या सीईओपदी मुंढे विराजमान झाले व प्रकल्पात अडथळे आणणे सुरू केले. याची गंभीर दखल घेत गडकरी यांनी नागरी विकास मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार केली. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याशी चर्चाही केली. यानंतर दिल्लीहून चौकशीसाठी एक समिती आली व त्या समितीने मुंढे यांचे सीईओपद बेकायदेशीर असल्याचे सांगितले. यानंतर मुंढे यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या कामाची चौकशी सुरू झाली. यानंतर मुंबईच्या सूचनेनुसार मुंढे यांनी गडकरी यांची भेट घेत आपली बाजू मांडली. गडकरींच्या नाराजीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली असता त्यांनी गडकरी यांना फोन केला व त्यांना त्रास देण्याचा कुठलाही उद्देश नसल्याचे स्पष्ट केले.

मुुंंढे यांची १५ वर्षांत १४ वेळा झाली बदली!
मुंबई : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे कोरोनाग्रस्त असतानाच राज्य शासनाने बुधवारी त्यांची बदली केली. त्यांच्या जागी राधाकृष्णन हे नागपुरात नवे महापालिका आयुक्त असतील.

उद्धव ठाकरे व गडकरी यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मात्र, गडकरी यांनी त्यांच्याकडे आपली नाराजी स्पष्टपणे मांडली. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीदेखील गडकरी यांना फोन केला व मुंढे यांच्याप्रति असलेली नाराजी दूर करून कोणतीही कडक कारवाई न करण्याची विनंती केली. सूत्रांच्या मते, यानंतर एक अदृश्य करार झाला की मुंढे यांना तत्काळ नागपूरहून बदलविण्यात यावे. यामुळे गडकरींची वजनदार प्रतिमा कायम राहील. अशा प्रकारे मुंढे यांची रवानगी झाली.

Web Title: Nitin Gadkari's displeasure around Tukaram Mundhe! An 'invisible' agreement was reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.