“कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात, नुसती कविता करण्यात व्यस्त असतात”; राष्ट्रवादीचा टोला
By प्रविण मरगळे | Updated: September 28, 2020 19:31 IST2020-09-28T19:18:01+5:302020-09-28T19:31:04+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रेड सिग्नल दिला. त्यामुळे राष्ट्रवादी नाराज होती असं रामदास आठवले म्हणाले होते.

“कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात, नुसती कविता करण्यात व्यस्त असतात”; राष्ट्रवादीचा टोला
मुंबई - कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात त्यातील केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे एक आहेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपप्रणित एनडीएसोबत येवून सरकार बनवावे असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला होता. त्या सल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
याबाबत महेश तपासे म्हणाले की, ज्या वर्गाच्या हिताचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारने दिली त्याला बगल देऊन नुसती कविता करण्यात व्यस्त असतात आणि फुकटची प्रसिद्धी कशी मिळेल मग ते कारण काहीही असो त्याच प्रयत्नात असतात. एकीकडे मोदी सरकार हळूहळू सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करत असताना त्या कंपनीतील उपेक्षित वर्गाच्या कामगार, कर्मचारी यांच्या हिताच्या संरक्षणासाठी आपलं मंत्रालय काय करीत आहे? असा सवाल त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना केला.
तसेच कोरोना व त्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे उध्वस्त झालेल्या मागास समाजातील उद्योजक , अल्पभूधारक शेतकरी या वर्गातील लोकांसाठी आपण फक्त कविताच केली का असा खडा सवालही प्रवक्ते महेश तपासे यांनी रामदास आठवले यांना विचारला आहे.
काय म्हणाले होते रामदास आठवले?
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवारांनी केंद्र सरकारसोबत यावं, असं रामदास आठवले म्हणाले होते. पवार सोबत आल्यास राष्ट्रवादीला सत्तेतही वाटा मिळेल, असं त्यांनी म्हटलं. राज्य सरकारमधील पक्षांमध्ये नाराजी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रेड सिग्नल दिला. त्यामुळे राष्ट्रवादी नाराज होती. कोरोना काळात काही निर्णय घेण्यात आले. त्या प्रक्रियेत स्थान देण्यात आलं नाही, अशी काँग्रेसची तक्रार होती, याकडे आठवलेंनी लक्ष वेधलं.
मुख्यमंत्रिपदावरून सुचवला २-३ चा फॉर्म्युला
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावरही आठवलेंनी तोडगा सुचवला. 'उद्धव ठाकरे जवळपास एका वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणखी एखादं वर्ष मुख्यमंत्री राहावं. त्यानंतरची तीन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील, असा पर्याय आठवलेंनी सुचवला. 'भाजपासोबत आल्यावर सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होईल. त्यांना केंद्रातही एक-दोन मंत्रिपदं मिळतील, असं आठवले म्हणाले.