महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल; शरद पवारांची वर्षपूर्ती सोहळ्यात ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 03:11 AM2020-12-04T03:11:40+5:302020-12-04T12:40:04+5:30

कधी नव्हे ते मिळालेली सत्ता हातून गेल्याने येणारी अस्वस्थता विरोधकांमध्ये या वर्षभरात पाहायला मिळाली.

Mahavikas Aghadi government will last for 25 years; Testimony of Sharad Pawar in the year-long ceremony | महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल; शरद पवारांची वर्षपूर्ती सोहळ्यात ग्वाही

महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल; शरद पवारांची वर्षपूर्ती सोहळ्यात ग्वाही

Next

मुंबई : महाराष्ट्रातली जनता काम करणाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी असते. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे, त्यामुळे हे सरकार पाच नाही तर २५ वर्षे टिकेल, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार उपस्थित होते.

या वेळी पवार म्हणाले, कधी नव्हे ते मिळालेली सत्ता हातून गेल्याने येणारी अस्वस्थता विरोधकांमध्ये या वर्षभरात पाहायला मिळाली. विरोधकांच्या टीकेमुळे अनेकांनी या सरकारविषयी शंका उपस्थित करून ठेवल्या होत्या. त्यामुळेच सरकारसंबंधित चिकित्सा करण्याची भूमिका माध्यमांनीदेखील घेतली. मात्र हे सरकार सगळ्या परीक्षेला यशस्वीपणे सामोरे गेले आहे. 

‘मुख्यमंत्री झालो यावर विश्वास बसत नाही’
या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री झालो यावर अजूनही विश्वास बसत नाही. जे लोक शिवसेनेला गृहीत धरून चालले होते त्यांना आता कळून चुकले की, शिवसेना फरपटत जाणाऱ्यांपैकी नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. आपल्याला संघर्षाचा चांगला अनुभव आहे. एकमेकांशी संघर्ष करत आपण इथपर्यंत आलो. आशीर्वाद कसे कमावू शकतो हे वर्षभरात मी अनुभवले. शरद पवार वर्षभरात ज्या ज्या वेळी भेटले त्या वेळी त्यांनी अनुभवातून आलेले प्रसंग सांगितले. सरकार चालवण्यासाठीचा अनुभव त्यांनी दिला. सोनिया गांधी यांचे सतत फोनवर बोलणे होत असते. आमचे लोक त्रास तर देत नाहीत ना, असेही त्या मला विचारतात, असा चिमटाही ठाकरे यांनी काढला त्या वेळी सभागृहात हास्याचे फवारे उडाले.

हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत आहे. सरकारने वर्षभरात संकटग्रस्ताला धीर दिला. त्यामुळे संकटकाळात बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही. नवीन उमेद आणि प्रदीर्घ अनुभव या समन्वयातून या शासनाची वाटचाल सुरू आहे.- शरद पवार   

Web Title: Mahavikas Aghadi government will last for 25 years; Testimony of Sharad Pawar in the year-long ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.