Maharashtra Gram Panchayat Election Results : Mahavikas Aghadi win in the result of Gram Panchayat, Ajit Pawar says ... | ग्रामपंचायतीच्या निकालात महाविकास आघाडीची मुसंडी, अजित पवार म्हणतात...

ग्रामपंचायतीच्या निकालात महाविकास आघाडीची मुसंडी, अजित पवार म्हणतात...


मुंबई - राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सुरू आहे. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कांग्रेस या महाविकास आघाडीमधील पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी पुरस्कृत केलेले उमेदवार विजयी ठरू लागल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात्य महाविकास आघाडीचीच चलती असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या स्थानिक निवडणुकांच्या नियोजनाची जबाबदारी आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांकडे सोपवली होती. त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचीच चलती दिसून आली. त्यासाठी मी या कार्यकर्त्यांचं कौतुक करतो.

आज मतमोजणी सुरू असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. तर भाजपा दुसऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या आणि काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारला स्वारस्य राहिलेले नाही. आठ-दहा वेळा झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. हा एकप्रकारे शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकरी लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्याबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्दैवी आहे. त्यामुळे केंद्राचा निषेध करतो, अशा शब्दात अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

Web Title: Maharashtra Gram Panchayat Election Results : Mahavikas Aghadi win in the result of Gram Panchayat, Ajit Pawar says ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.