Lok sabha Election should be cancelled if theres any mismatch in VVPAT and EVM vote count says AAP | ...तर निवडणूकच रद्द करा; एक्झिट पोलनंतर आपची मागणी
...तर निवडणूकच रद्द करा; एक्झिट पोलनंतर आपची मागणी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातलं मतदान संपताच एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला. यानंतर आम आदमी पार्टीनं पुन्हा एकदा ईव्हीएमला लक्ष्य केलं. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधील पडताळणी चुकल्यास निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी केली. 

दिल्लीमध्ये आपचं सरकार आहे. मात्र बहुतांश एक्झिट पोल्समध्ये दिल्लीत आपला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. देशाच्या राजधानीत भाजपाला निर्विवाद यश मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर आपनं एक्झिट पोल्स आणि ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'खरा खेळ ईव्हीएमच्या माध्यमातून खेळला जाणार का? पैसे घेऊन एक्झिट पोल केले जातात का? बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगाल. या सगळ्याच राज्यांमध्ये भाजपा विजयी होणार, हे कसं शक्य आहे?'', असे प्रश्न सिंह यांनी ट्विटमधून उपस्थित केले आहेत.
संजय सिंह यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षातील नेत्यांना आवाहन केलं आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीत चूक आढळल्यास सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी करावी, असं सिंह म्हणाले आहेत. काल सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वाहिन्यांनी त्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध केले. यातील बहुतांश एक्झिट पोल्सनी एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीत आपला भोपळाही फोडता येणार नाही, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. तर काही एक्झिट पोल्समध्ये आपला दिल्लीत एक जागा मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 


Web Title: Lok sabha Election should be cancelled if theres any mismatch in VVPAT and EVM vote count says AAP
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.