चंदिगड: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वादग्रस्त विधानांनी, जोरदार टोलेबाजीनं चर्चेत असलेले काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्या घशावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांना प्रचारसभांमध्ये भाषण करता येणार नाही. सध्या सिंग यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना प्रचारापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सततच्या भाषणांमुळे सिद्धू यांच्या स्वरयंत्रावर परिणाम झाल्याची माहिती त्यांच्या कार्यालयानं दिली. सध्या सिद्धू डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेल्या सिद्धूंनी गेल्या काही दिवसांत अनेक विधानं केली आहेत. त्यामुळे मोठे वादही झाले आहेत. काही दिवसांपूर्वी इंदूरमधल्या एका जनसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना नव्या नवरीशी केली. पंतप्रधान मोदी नव्या नवरीसारखे आहेत. नवी नवरी काम कमी करते. पण तिच्या बांगड्यांचा आवाज जास्त असतो. मी काम करते आहे, असं इतरांना कळावं यासाठी नवी नवरी बांगड्यांचा आवाज करते. मोदी सरकारच्या काळात हेच झालं, असं विधान सिद्धूंनी केलं होतं. काळ्या इंग्रजांना सत्तेबाहेर फेका, असं वादग्रस्त वक्तव्य सिद्धू यांनी केलं होतं. पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. 'मोदी केवळ खोटं बोलतात. त्यांच्याकडून सत्य बोलण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे,' असं सिद्धू म्हणाले होते. डासाला (मच्छरला) कपडे घालणं. हत्तीला कुशीत घेणं आणि मोदींकडून सत्य वदवून घेणं अशक्य आहे, असा टोला त्यांनी लगावला होता.
सिद्धूंची बोलंदाजी थांबणार; 28 दिवसांमध्ये 80 रॅली केल्यानंतर आवाज बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 19:07 IST