मुंबई: भाजपा अध्यक्ष अमित शहा लोकसभा निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुजरातला जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. त्यासाठी शहांनी उद्धव ठाकरेंना गुजरातला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. उद्धव यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आहे. सध्या राज्यसभेचे खासदार असलेले अमित शहा यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. ते उद्या गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील. मात्र त्याआधी भव्यदिव्य रोड शो केला जाईल. त्यासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात आलं आहे. ठाकरे यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आहे. शिवसेना आणि भाजपामधील संबंध गेल्या चार वर्षांमध्ये अतिशय ताणले गेले होते. मात्र फेब्रुवारीत दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून एकी दाखवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शिवसेनेनं सतत त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर उद्धव यांनी पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही शिवसेना केंद्र आणि राज्यातील सरकारमध्ये कायम होती. या काळात अनेकदा शिवसेनेकडून खिशात घालण्याचे इशारे देण्यात आले. अमित शहांनीही पटक देगें म्हणत शिवसेनेवर शरसंधान साधलं होतं. तर उद्धव यांनी भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्र्यांचा उल्लेख अफजलखानाच्या फौजा म्हणून केला होता. मात्र फेब्रुवारीत दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील 25 जागा भाजपा, तर 23 जागा शिवसेना लढवेल. तर विधानसभेला निम्म्या म्हणजेच प्रत्येकी 144 जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अमित शहा उद्या भरणार उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 09:47 IST