"Keep mental health, Shiv Sena Target Devendra fadanvis wife Amrita Fadnavis | ‘अ’मृतावस्थेत न जाता मानसिक स्वास्थ जपा, योगा करत जा; शिवसेनेचा अमृता फडणवीसांना टोला

‘अ’मृतावस्थेत न जाता मानसिक स्वास्थ जपा, योगा करत जा; शिवसेनेचा अमृता फडणवीसांना टोला

ठळक मुद्देअमृता यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेचा उल्लेख "शवसेना" असा केला. आपल्याला ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचा अमृता फडणवीसांना टोला

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता आणि शिवसेना यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस वाढत आहेत. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रीय असतात, अनेकदा अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर जाहीरपणे टीका करत खिल्ली उडवली आहे, नुकतेच बिहार निवडणुकीच्या निकालावरून देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ पोस्ट करत अमृता यांनी शिवसेनेचा उल्लेख “शवसेना” असा केला होता. त्यावरून आता शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

याबाबत शिवसेना नेत्या म्हणाल्या की, अमृताशब्दातील अ चे भान महत्वाचे, अमृता ताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत, शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील "अ" मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, मन स्वास्थ चांगले राहते, आणि हो शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शव वाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते आजही हे देखील विसरु नका असा चिमटा त्यांनी काढला आहे.

तसेच आपल्या नावात "अ" च महत्व आहे ते निघाले तर "मृता" राहिल , शिवसेनेची काळजी करू नका, आपले मानसिक स्वास्थ जपा, "अ" मंगल विचार मनात आणणे "अ" योग्य बरे का !! आपल्याला ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो असा टोलाही नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कधीच गाणं म्हणणे, चेहरा बदलणे आणि वाटेल ती विधाने करणे जमले नाही असंही म्हटलं आहे.

"महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी", शिवसेनेला 'शवसेना' म्हणत अमृता फडणवीसांचा हल्लाबोल

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

अमृता यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेचा उल्लेख "शवसेना" असा केला. "'शिवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारलं बिहारमध्ये, काय चाललंय तरी काय? महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद" असं ट्विट केलं होतं, अमृता फडणवीस यांनी बिहारमधील मतदारांचे आभार मानले. पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना ५० जागांवर लढणार असल्याचं जाहीर केले. परंतु शिवसेनेने २२ जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व २२ जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे. यावरून अमृता फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला होता.

Web Title: "Keep mental health, Shiv Sena Target Devendra fadanvis wife Amrita Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.