सावंतवाडी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकार वर केलेल्या टिकेवर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर देण्याचे टाळत काय बोलायचे असा सवाल केला व हसतच प्रश्नाला बगल दिली. मात्र यावेळी त्यांनी महाविकास आघाडीने राज्यपालांकडे दिलेल्या बारा उमेदवाराची यादी मंजूर करतील असा विश्वास ही व्यक्त केला.मंत्री जयंत पाटील हे रविवारी सिंधुदुर्ग च्या दौऱ्यावर आले असता रात्री उशिरा सावंतवाडीत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,काका कुडाळकर,अबिद नाईक,पुंडलिक दळवी,रेवती राणे,प्रफुल्ल सुद्रिक आदि उपस्थित होते.
काय म्हणाले होते अण्णा हजारे
महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार टीका केली होती. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा, अशी परिस्थिती आहे, असा टोला अण्णांनी लगावला होता. एबीपी माझा ह्या वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधताना अण्णांनी ही टीका केली. लोकायुक्तांच्या नियुक्ती कायद्यासाठी मी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्र लिहिली. पण मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता कुणीही पत्राला उत्तर दिले नाही, असे अण्णा हजारेंनी यावेळी सांगितले.