'काँग्रेसनं लोकसभा निवडणूक जिंकल्यास पाकिस्तानात दिवाळी साजरी होईल'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:27 PM2019-03-25T13:27:27+5:302019-03-25T13:29:26+5:30

काँग्रेस जिंकल्यास पाकिस्तानमध्ये आनंद साजरा होईल; भाजपा मुख्यमंत्र्याचं अजब विधान

If Congress Wins By Mistake Pakistan Will Celebrate Diwali says gujarat cm Vijay Rupani | 'काँग्रेसनं लोकसभा निवडणूक जिंकल्यास पाकिस्तानात दिवाळी साजरी होईल'

'काँग्रेसनं लोकसभा निवडणूक जिंकल्यास पाकिस्तानात दिवाळी साजरी होईल'

Next

अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीत चुकून काँग्रेसला यश मिळाल्यास पाकिस्तानात दिवाळी साजरी होईल, असं विधान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केलं आहे. 'येत्या निवडणुकीत असं काही घडणार नाही. पण 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि त्यात चुकून काँग्रेसचा विजय झाला, तर पाकिस्तानात आनंद साजरा होईल. कारण ते (काँग्रेस) त्यांच्याशी संबंधित आहेत,' असं रुपानी यांनी मेहसाण्यात भाजपाच्या विजय संकल्प रॅलीला सुरुवात करताना म्हटलं. 

देशातील जनता मोदींच्या पाठीमागे उभी राहील आणि 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालात त्यांनाच विजयी करेल, असा विश्वास गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे मागणारे काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांच्यावर शरसंधान साधलं. 'पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो, ही बाब संपूर्ण जगाला माहीत आहे. मात्र पाच-सात जणांच्या कृत्यासाठी पाकिस्तानला दोषी धरणं चुकीचं असल्याचं राहुल गांधींचे शिक्षक असलेल्या पित्रोडांना वाटतं. काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत,' अशी टीका रुपानी यांनी केली. 

विरोधक सुरक्षा दलांचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुरक्षा दलांच्या प्रमुखांची विधानं खोटी ठरवून तुम्ही नेमकं कोणाचं समर्थन करत आहात?, असा प्रश्न रुपानी यांनी विचारला. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची सुटका एनडीए सरकारनंच केली होती, या राहुल गांधींच्या विधानावरदेखील त्यांनी भाष्य केलं. काँग्रेसनं त्यांच्या सत्ताकाळात अनेक दहशतवाद्यांची सुटका केल्याचं ते म्हणाले. काँग्रेसनं मतपेढीचं राजकरण करत फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांनी केला. 
 

Web Title: If Congress Wins By Mistake Pakistan Will Celebrate Diwali says gujarat cm Vijay Rupani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.