Shiv Sena: शिवसेनेत युवा उमेदवारांना संधी देण्याचा विचार; निवडणुकीसाठी ठरला ‘हा’ महत्त्वाचा निकष?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 14:24 IST2022-01-07T14:23:49+5:302022-01-07T14:24:39+5:30
कोविड काळामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ५० पेक्षा कमी वयोगटातील उमेदवारांना संधी देण्याचा विचार सुरु असल्याची चर्चा आहे.

Shiv Sena: शिवसेनेत युवा उमेदवारांना संधी देण्याचा विचार; निवडणुकीसाठी ठरला ‘हा’ महत्त्वाचा निकष?
मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यंदाच्या निवडणुकांवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे प्रचारावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. अलीकडेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील सर्व शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदारांची बैठक घेत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचवा असा आदेशच उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
त्याच आता शिवसेनेत(Shivsena) पन्नाशी ओलांडलेल्यांना उमेदवारी मिळणार का? अशी चर्चा सुरु आहे. विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यानुसार शिवसेनेत ५० वर्षावरील विद्यमान नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीचं तिकीट न देण्याबाबत माहिती समोर आली आहे. त्यामुळे याआधीही ३ टर्म असो ४ टर्म निवडून आलेला असो तिकीट मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. वय ग्राह्य धरुनच तिकीट मिळेल अशी कुजबूज सुरु असल्याचं समोर आलं आहे.
त्यात शिवसेनेत जुने आणि नवे शिवसैनिक यांच्यात मध्यंतरीच्या काळात काही वाद समोर आले होते. आदित्य ठाकरेंची युवासेना आणि शिवसेना यांच्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं चित्र समोर आलं. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव सक्रीय असतील की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी येणार आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेना मुंबई महापालिका निवडणूक लढवणार का हे आगामी काही दिवसांत कळेल. परंतु तत्पूर्वी शिवसेनेच्या गोटातून ५० वर्षावरील नगरसेवकांना वेटिंगवर राहावं लागण्याची शक्यता आहे.
मात्र शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे कुठलीही चर्चा शिवसेनेत नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात निवडणुकीची तयारी सुरु आहे. तरुणांना संधी मिळाली हवी पण त्यासाठी ज्येष्ठांना डावलण्यात येणार नाही असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेबाबत प्रकाशित झालेल्या बातम्या कुणीतरी हेतुपुरस्पर पेरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सर्वच राजकीय पक्षांमध्ये कुजबूज
गेल्या २ वर्षापासून जगात तसेच राज्यात कोरोनाचं संकट आहे. या कोरोनाच्या संकटात नव्या पिढीने जोमानं रस्त्यावर उतरुन सक्षमपणे परिस्थिती हाताळायला हवी. कोविड काळात वयस्कर नेत्यांना काही निर्बंध पाळावे लागतील. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळायला हवी अशी चर्चा इतर राजकीय पक्षांमध्येही आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत पक्ष नेतृत्व काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.