विरोधकांची आपसात आघाडी; भाजपाची मात्र जनतेशी युती!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 06:22 AM2019-01-21T06:22:15+5:302019-01-21T06:23:06+5:30

काँग्रेससह देशभरातील २० विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी कोलकात्यात एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या ‘मोदी हटाव, देश बचाव’ नाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अत्यंत कडवट शब्दांत खिल्ली उडविली.

Front of the opposition; BJP's coalition with the people! | विरोधकांची आपसात आघाडी; भाजपाची मात्र जनतेशी युती!

विरोधकांची आपसात आघाडी; भाजपाची मात्र जनतेशी युती!

Next

नवी दिल्ली : काँग्रेससह देशभरातील २० विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी कोलकात्यात एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या ‘मोदी हटाव, देश बचाव’ नाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अत्यंत कडवट शब्दांत खिल्ली उडविली. ‘भ्रष्ट, घोटाळेबाज, नकारात्मक मानसिकता असलेले आणि देशाला अस्थिरतेशिवाय दुसरे काहीही न दिलेले’ स्वार्थी लोक ’महागठबंधन’च्या नावाखाली एकत्र येत आहेत, असा जोरदार पलटवार त्यांनी केला.
महाष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, माढा आणि सातारा तसेच गोव्यातील दक्षिण गोवा या लोकसभा मतदारसंघांमधील भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधताना मोदी बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की, विरोधी पक्ष आपसात आघाडी करण्याच्या गोष्टी करत असले तरी आपल्या पक्षाची (भाजपा) देशाच्या १२५ कोटी जनतेशी घट्ट युती आहे. या दोन्हींपैकी कोणती युती अधिक भक्कम आहे, असे तुम्हाला वाटते, असे मोदींनी कार्यकर्त्यांना विचारले.
कोलकत्यामधील विरोधकांच्या मेळाव्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, त्यांच्याकडे धनशक्ती आहे तर आमच्याकडे जनशक्ती आहे. कोलकत्यात व्यासपीठावर जे जमले होते ते एक तर वजनदार मंडळींची मुले होती किंवा ते आपल्या मुलाबाळांचे बस्तान बसवू पाहात होते. ज्या पक्षांमध्ये नावालाही अंतर्गत लोकशाही नाही तेच आज लोकशाहीच्या नावाने गळा काढून लोकांची दिशाभूल करीत आहेत, असेही ते म्हणाले. मतदानयंत्रांना ‘चोर मशिन’ असे संबोधून विरोधी नेत्यांनी आगामी निवडणूक जुन्या पद्धतीप्रमाणे मतपत्रिकेने घेण्याची मागणी केली होती. त्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने ही मंडळी आता मतदानयंत्राला ‘व्हिलन’ ठरवू पाहात आहेत. ते म्हणाले की, आपण निवडणूक जिंकावी असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटणे स्वाभाविक आहे. पण नेतेमंडळी लोकांना मूर्ख समजून गृहित धरू लागतात तेव्हा तो मोठा चिंतेचा विषय ठरतो.
सरकारने साडेचार वर्षांत लोककल्याण व विकासाच्या विविध योजना राबवून भारताला जगात कसे मानाचे स्थान मिळवून दिले, याचा पाढा मोदींनी वाचला. कार्यकर्त्यांनी हे काम लोकांपर्यंत पोहोचवून विरोधकांचा अपप्रचार खोडून काढावा, असे त्यांनी आवाहन केले.
>तेच बोफोर्सवर बोलू लागले
ज्या व्यासपीठावरून हे लोक देश आणि लोकशाही वाचविण्याच्या बाता करीत होते त्याच व्यासपीठावरून एका नेत्याने बोफोर्स घोटाळ्याची आठवण करून दिली. शेवटी सत्य लपत नाही, हेच खरे! - नरेंद्र मोदी

Web Title: Front of the opposition; BJP's coalition with the people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.