धुळे - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. दरम्यान, धुळ्यामधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील यांच्यासमोरच पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. जयंत पाटील कार्यक्रमासाठी आले असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली ही फ्रीस्टाईल हाणामारी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे धुळे येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले होते. त्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात अनिल गोटे यांचे समर्थक असलेले भूषण पाटील हे भाषणासाठी उभे राहीले असताना त्यांचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादास सुरुवात झाली. थोड्या वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि प्रदेशाध्यक्षांसमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले.दरम्यान, धुळे जिल्ह्यातील या कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या हाणामारीबाबत विचारणा केली असता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर कार्यकर्त्यामध्ये काही गोष्टींमुळे नाराजी असल्याने त्यांनी आपल्या मनातील राग यावेळी व्यक्त केला, अशी सारवासारव इतर नेत्यांनी केली. मात्र ही हाणामारी नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे कळू शकलेले नाही.
राष्ट्रवादीमधील गटबाजी चव्हाट्यावर, जयंत पाटलांसमोरच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 09:23 IST