Explainer: बिहारमध्ये डिपॉझिट गेलं, तरी शिवसेनेचं 'जय बांगला' कशासाठी-कुणासाठी?; जाणून घ्या 'राजनीती'

By मोरेश्वर येरम | Published: January 18, 2021 02:25 PM2021-01-18T14:25:48+5:302021-01-18T17:16:37+5:30

राज्याबाहेर शिवसेनेचं अस्तित्व काय? राज्याबाहेर निवडणुका लढविण्याचा नेमका फायदा? की तोटा? सविस्तर आढावा...

exclusive shiv sena political aspirations outside maharashtra contesting west bengal election | Explainer: बिहारमध्ये डिपॉझिट गेलं, तरी शिवसेनेचं 'जय बांगला' कशासाठी-कुणासाठी?; जाणून घ्या 'राजनीती'

Explainer: बिहारमध्ये डिपॉझिट गेलं, तरी शिवसेनेचं 'जय बांगला' कशासाठी-कुणासाठी?; जाणून घ्या 'राजनीती'

Next

- मोरेश्वर येरम

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळविल्यानंतर शिवसेनेनं राज्याबाहेरही डरकाळी फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत सेनेने उमेदवार दिले होते. त्यानंतर आता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीही शिवसेनेनं शड्डू ठोकला आहे. राज्यात सेनेला मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी महाविकास आघाडीचा जन्म व्हावा लागला. पण देशात शिवसेनेची हिंदुत्ववादी अशीच प्रतिमा आहे. त्यामुळे राज्याबाहेर शिवसेनेला खरंच पाठिंबा मिळेल का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. 

"देशात आजही बाळासाहेबांची प्रतिमा हिंदुत्ववादी नेता ही आहे. सेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. त्यामुळे बिहार अथवा बंगालमध्ये ज्या हिंदुत्ववाद्यांना भाजपला मत द्यायचे नाही त्यांना आपण पर्याय ठरू असं शिवसेनेला वाटत असेल", असं लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात. 

>> राजकीय प्रसिद्धी, टीआरपी आणि अस्तित्व

"महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढवून आपण राष्ट्रीय पक्ष आहोत हे दाखविण्याची धडपड शिवसेनेकडून केली जात आहे. यातून राजकीय प्रसिद्धी मिळवणे आणि मराठी माध्यमात जादा टीआरपी मिळवणे. यासोबतच भाजपाविरोधाची खात्री पटविण्याची सेनेची धडपड सुरू आहे", असं लोकमतचे पुण्याचे संपादक प्रशांत दीक्षित म्हणाले. 

 "शिवसेनेची नोंदणी ही राष्ट्रीय पक्ष म्हणून आहे. त्यामुळे आपलं राष्ट्रीय अस्तित्व दाखवणं ही शिवसेनेची गरज आहे. त्यामुळे शिवसेना जरी आपण महाराष्ट्रापुरती मर्यादीत असल्याचं म्हटलं तरी गोवा, कर्नाटक, बिहार किंवा पश्चिम बंगाल येथे निवडणूक लढवणं ही राष्ट्रीय अस्तित्व टीकवण्याची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रीय नोंदणी असल्यामुळे तसं अस्तित्व दाखवणं हे पक्षाला क्रमप्राप्त आहे", असं लोकमतचे मुंबईचे संपादक विनायक पात्रुडकर सांगतात. 

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेला जनाधारच नाही. तरीही अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवसेनेने हिंदुत्व ही विचारधारा स्वीकारली आहे असा कितीही दावा केला असला तरी भाजपला महाराष्ट्राच्या बाहेर पर्याय ठरत नाही. शिवसेनेची बिगरमराठी ही ठळक प्रतिमा मराठी मुलखाबाहेर आहे. त्या प्रांतात स्वीकार होत नाही, असं लोकमतचे कोल्हापूरचे संपादक वसंत भोसले म्हणाले. 

भाजपला पाडण्याचा आणि पर्याय ठरण्याचा मनसुबा

भविष्यात हिंदुत्वावादी मतदारांचा भाजपपासून भ्रमनिरास झाल्यास पर्याय म्हणून स्वत:ला उभं करणं हा शिवसेनेचा मानस असल्याचं लोकमतचे अकोला येथील संपादक रवी टाले सांगतात. 

२०१५ च्या बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेला अवघी सव्वादोन लाख मते मिळाली होती. मात्र, काही मतदारसंघात पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे भविष्यात कधीतरी पाय रोवता येईल, या दृष्टीकोनातूनही शिवसेनेला राज्याबाहेर निवडणूक लढवणं महत्वाचं ठरतं. 

"भाजपमधील असंतुष्टांना तिकीटे देऊन काही मतदार संघात भाजपच्या अधिकृत उमेदवारांना पाडण्याचा मनसुबा शिवसेनेनं आखला आहे", असं संदीप प्रधान यांनी सांगितलं. 

तेजस ठाकरेंच्या भवितव्याचा विचार

पक्षाची व्याप्ती वाढविण्याची प्रत्येक पक्षाची महत्वाकांक्षा असते. यातून त्या त्या पक्षाला आणि त्या अनुशंगाने पक्षातील नेत्यांना फायदा होत असतो. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेची आपल्या नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात पाठविण्याची महत्वाकांक्षी देखील याचाच एक भाग आहे. 

"राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्यापद्धतीनं सुप्रिया सुळे आणि अजित पवार अशी वाटणी आहे. त्याच पद्धतीनं भविष्यात तेजस ठाकरे राजकारणात आले तर आदित्य ठाकरे यांना राष्ट्रीय राजकारणात पाठवता येईल. तर राज्याच्या राजकारणात तेजस ठाकरे यांना सक्रीय करता येऊ शकेल, असाही शिवसेनेचा विचार असावा", असं संदीप प्रधान यांनी सांगितलं. 

एकंदर शिवसेनेला राज्याबाहेर अपेक्षित यश मिळताना दिसत नाही हे वास्तव आहे. पण राष्ट्रीय राजकारणात अस्तित्व टीकवणं आणि भाजपसोबतच्या सध्याच्या वितुष्टामुळे त्या पक्षाला जास्तीत जास्त फटका बसेल यासाठीच्या धोरणातून इतर राज्यात निवडणूक लढवणं शिवसेनेला राजकीय दृष्ट्या फायद्याचं ठरू शकतं, असं दिसून येतं. पण केवळ उमेदवार देऊन मतं खाण्याच्या भूमिकेतून बाहेर येऊन स्थानिक पातळीवर संघटनात्मक पाठिंबा वाढविण्याकडे शिवसेनेनं लक्ष देण्याची गरज आहे. शेवटी पाया भक्कम केल्याशिवाय इमले बांधता येऊ शकत नाहीत, हेच वैश्विक सत्य स्वीकारावं लागेल. 

Web Title: exclusive shiv sena political aspirations outside maharashtra contesting west bengal election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.