...तोपर्यंत आम्ही निवडणुका जिंकू शकणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून घरचा अहेर

By कुणाल गवाणकर | Published: November 22, 2020 07:02 PM2020-11-22T19:02:55+5:302020-11-22T19:07:31+5:30

पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल नोंदवले अनेक आक्षेप; बदलांची मागणी

elections are not fought by sitting in file star hotels says congress leader ghulam nabi azad | ...तोपर्यंत आम्ही निवडणुका जिंकू शकणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून घरचा अहेर

...तोपर्यंत आम्ही निवडणुका जिंकू शकणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून घरचा अहेर

Next

नवी दिल्ली: गेल्या दोन लोकसभा निवडणुकांसह अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसमधील कलह आता समोर येऊ लागले आहेत. वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्ष नेतृत्त्वावर थेट निशाणा साधल्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर भाष्य केलं आहे. त्यांनी नेतृत्त्वावर थेट टीका केली नसली तरी पक्षामध्ये अनेक आमूलाग्र बदल घडवण्याची मागणी केली आहे. 

पक्षात कोणतीही बंडखोरी नसल्याचं आझाद यांनी स्पष्ट केलं. 'बंडखोरी एखाद्याला हटवण्यासाठी होते. वजीर राजावर सैन्य घेऊन हल्ला चढवतो आणि राजाला सिंहासन गमवावं लागतं, याला बंडखोरी म्हणतात. काँग्रेसमध्ये तशी स्थिती नाही. इथे आम्ही काही बदलांसाठी आग्रही आहोत. इथे वजीर राजाला त्याची चूक दाखवत आहेत. एखाद्या कृतीचे, निर्णयाचे परिणाम वजीर राजाला सांगत आहे. त्याला सतर्क करत आहे. आम्ही बदलांची मागणी करत आहोत. कारण बदल झाल्यास पक्ष आणि देश अडचणीत सापडेल', असं आझाद यांनी सांगितलं.




एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आझाद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवलं. 'फाईव्ह स्टार संस्कृतीमुळे निवडणुका जिंकता येत नाहीत. आता पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी मिळाल्यास ते थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जातात. त्यातही फाईव्ह स्टारमधील डिलक्सला प्राधान्य असतं. त्यांना फिरण्यासाठी वातानुकूलित कार हवी असते. एखाद्या ठिकाणी कच्चा रस्ता असल्यास नेते तिथे जात नाहीत. जोपर्यंत पक्षातील ही फाईव्ह स्टार संस्कृती संपत नाही, तोपर्यंत आपण निवडणुका जिंकू शकणार नाही,' असं परखड मत आझाद यांनी मांडलं.




काँग्रेसची अवस्था इतकी वाईट कशी झाली, यावरही आझाद यांनी विस्तृत भाष्य केलं. 'पहिल्यांदाच पक्षाची स्थिती इतकी दयनीय आहे. पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला संवाद संपला आहे. फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये बसून निवडणूक लढवल्या जात नाहीत. आता एखाद्याला पद मिळाल्यास तो लगेच व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड छापतो. आता आपलं काम संपलं असं त्याला वाटतं. मात्र खरंतर पद मिळाल्यापासून त्याचं काम सुरू होतं. पण ही जाणीव अनेकांना नसते,' अशा स्पष्ट शब्दांत आझाद यांनी त्यांची मतं मांडली.

Web Title: elections are not fought by sitting in file star hotels says congress leader ghulam nabi azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.